पुणे : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ऑनलाइन सुरू आहेत. या प्रक्रियेत माहिती भरताना शिक्षकांनी जाणीवपूर्वक चुकीची माहिती भरल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. बदलीच्या ऑनलाइन प्रक्रियेतून देखील बाद करण्याचे आदेश राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग एक आणि दोन या ऑनलाइन प्रक्रियेत अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये शिक्षकांनी खोटी आणि चुकीची माहिती सादर केली. त्याआधारे शिक्षकांची बदली झाल्यास पात्रताधारक शिक्षकांवर अन्याय होतो. या बदल्यांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत. पुढील दोन दिवसांत अर्जांचे काटेकोरपणे पडताळणी करण्यास राज्य शासनाकडून सूचना करण्यात आली आहे. पात्रता नसतानाही जाणीवपूर्वक खोटी आणि चुकीची माहितीच्या आधारे अर्ज केल्याचे आढळल्यास संबंधित शिक्षकाला त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येणार आहे.

हेही वाचा: आमदार भास्कर जाधव यांना अटकपूर्व जामीन मंजूर

ही सर्व प्रक्रिया गुरुवारपर्यंत (२४ नोव्हेंबर) पूर्ण करण्यात येणार आहे. अशा खोट्या व चुकीच्या माहिती आणि प्रमाणपत्राच्या आधारे अर्ज भरल्यास संबंधित शिक्षकाचा अर्ज ऑनलाइन प्रक्रियेतून बाद करण्यात येणार आहे. तसेच शिक्षकाविरूद्ध शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. आता बदल्यांमध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग एक आणि दोनमधील बदल्यासंदर्भात ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज सादर करण्याची मुदत संपली असल्यामुळे अशा शिक्षकास नव्याने अर्ज भरण्याची मुभा असणार नसल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.