पुणे : राज्य सरकारने सहकार आयुक्त सौरभ राव यांची ठाणे महापालिका आयुक्तपदी बदली केली. सहकार आयुक्त पदाचा कार्यभार सोडताना राव यांनी पुण्यातील एका सोसायटीचे बेकायदा लेखापरीक्ष केल्याप्रकरणी एका लेखापरीक्षकाला दणका दिला आहे. गेल्या वर्षभरापासून ही तक्रार सहकार आयुक्तांकडे प्रलंबित होती. मात्र, राव यांच्या आधीच्या सहकार आयुक्तांनी याबाबत निर्णय घेतला नव्हता.
हेही वाचा >>> आता तुम्हाला कोणाचा फोन आलाच, तर तुम्ही त्यांना सांगा तुम्ही पण या: जयंत पाटील यांचा धनंजय मुंडे यांना टोला
वाघोली येथील सिट्रॉन सहकारी गृहरचना संस्थेचे वैशाली भट्टू प्रमाणित लेखापरीक्षक यांनी सन २०१८-१९ ते सन २०२१-२२ या सलग पाच वर्षांच्या कालावधीचे लेखापरीक्षण पूर्ण केले. त्यांनी कायद्यातील तरतूदींचे पालन केले नाही. तसेच सोसायटीने सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत नियुक्ती केली नसताना सन २०१७-१८ चे लेखापरीक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे भट्टू यांचे राज्यस्तरीय लेखापरीक्षकांच्या पॅनेलमधून नाव कमी करण्याचे आदेश राव यांनी दिले आहेत. ‘लेखापरीक्षक भट्टू यांनी बेकायदा आमच्या सोसायटीचे लेखापरीक्षण केले होते. लेखापरीक्षण करताना त्यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ८१ अन्वये शासनाच्या नियमांचे पालन केले नव्हते. तसेच संस्थेच्या मागील व्यवस्थापन समितीने केलेला गैरव्यवहार उघड केला नव्हता. त्याची तक्रार आम्ही सहकार विभागाकडे साधारण वर्षभरापूर्वी केली होती. सहकार आयुक्त राव यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत आवश्यक ते सर्व पुरावे आम्ही आयुक्तांसमोर सादर केले. त्याअनुषंगाने कारवाई करण्यात आल्याचे सिट्रॉन सहकारी गृहरचना संस्थेचे चेअरमन राहुल बोरसे यांनी सांगितले.