पुणे : जगातील तिसऱ्या क्रमांकाची महासत्ता होण्यासाठी आपला देश विकसित होणे गरजेचे आहे. विकसित होण्यासाठी व्यक्ती व समाजाच्या विकास आवश्यक असून, त्याला सहकाराशिवाय पर्याय नाही, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी व्यक्त केले. कॉसमॉस बँकेच्या विद्यापीठ रस्त्यावरील मुख्य कार्यालयाच्या सहकार सभागृहात नवीन राष्ट्रीय सहकार धोरण निश्चितीचे पैलू या विषयावर प्रभू बोलत होते. ते म्हणाले की, देश विकसित करण्यासाठी देशाची संपूर्ण क्षमता आपण वापरली पाहिजे.
व्यक्तीचा आणि समाजाचा विकास होणे त्यामुळेच आवश्यक आहे आणि हे सहकारामुळेच साध्य होऊ शकेल. कायमस्वरूपी वाढत राहील अशी अर्थव्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे. शेतकरी, कामगार, महिला, युवक, नवउद्योजक या सर्वांना बळ मिळाले पाहिजे. सहकाराच्या माध्यमातून गावपातळीवर विविध व्यवसाय करण्यासाठी अनेक दालने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. नवीन राष्ट्रीय सहकार धोरण तयार करताना या सर्व बाबींचा विचार बारकाईने करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; परीक्षा कधी, अर्ज भरण्यासाठीची मुदत किती?
कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था सदृढ करण्यासाठी सहकार क्षेत्राचे नवीन व्यापक धोरण ठरविण्याचे काम वेगाने सुरू आहे. सहकार क्षेत्रापुढील आव्हाने वाढली आहेत. उत्तम उत्पादने व उत्तम सेवा देण्यासाठी तंत्रज्ञान व आर्थिक पाठबळ यांची गरज आहे. केंद्र व राज्य सरकार याबाबत योग्य ते धोरण आखत असल्यामुळे आगामी काळात सहकार क्षेत्र मजबूत होणार आहे.
हेही वाचा >>> मोहोळ यांच्या कार्यालयात दूरध्वनी करताच १२० विद्यार्थ्यांच्या हवाई प्रवासातील विघ्न दूर! जाणून घ्या नेमकं काय घडलं…
महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर म्हणाले की, सहकार धोरण यशस्वी होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एकाच हेतूने काम करणे गरजेचे आहे. नवीन सहकार धोरणाबरोबरच त्याच्या प्रभावी अंमलबजावणीचा आराखडा तयार करण्यात आला आहे, याचा फायदा सहकार क्षेत्राला होणार आहे. केंद्र सरकारने स्वतंत्र सहकार खाते निर्माण केल्यामुळे सहकाराला बळ आले आहे. चांगल्या धोरणांचा पाठपुरावा करणेही महत्वाचे असते. सहकार चळवळ ही शासन प्रणित चळवळ आहे, हे या नवीन सहकार धोरणात अधोरेखित करण्यात आले आहे. सहकाराला सामान्य माणसाची समृध्दी अपेक्षित आहे.
या कार्यक्रमात ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूटच्या (वैमनीकॉमच्या) संचालिका डॉ. हेमा यादव, शिखर संघटनेचे प्रभात चतुर्वेदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सहकार क्षेत्रातील अनेक संस्थांचे अध्यक्ष, संचालक, कार्यकारी अधिकारी व इतर पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने हजेरी लावली.