राहुल खळदकर

विनावापरामुळे गंभीर अपघात; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोलिसांची कारवाई तीव्र

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून घडणाऱ्या बहुसंख्य अपघातांमध्ये सुसाट वेग कारणीभूत ठरल्याचे निरीक्षण महामार्ग पोलिसांकडून वेळोवेळी नोंदविण्यात आले आहे. सुसाट वेगाबरोबरच आसनपट्टा (सीटबेल्ट) न वापरणाऱ्या मोटारचालकांचा निष्काळजीपणा देखील दुर्लक्षित करता येत नाही. मोटारातील प्रवाशांची सुरक्षेची जबाबदारी चालकावर असते. त्यामुळे सीटबेल्ट न वापरणाऱ्या मोटारचालक तसेच प्रवाशांविरुद्ध महामार्ग पोलिसांकडून कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांत साडेसातशे मोटारचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दीड लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर घडलेल्या गंभीर अपघातांची माहिती महामार्ग पोलिसांकडून संकलित करण्यात आली आहे. गंभीर स्वरूपाच्या अपघातात सीटबेल्ट वापरणारा मोटारचालक बचावला. पण मोटारीतील सहप्रवासी अपघात झाल्यानंतर थेट ज्या वाहनांवर मोटार धडकली आहे त्या वाहनांवर धडकल्याची उदाहरणे आहेत. काही घटनांमध्ये सहप्रवासी मोटारीच्या काचेवर आदळल्याचे दिसून आले आहे. पंधरा दिवसांपूर्वी केरळमधील एक अभियंता द्रुतगती मार्गावर मोटार अपघातात मृत्युमुखी पडला होता. या अपघातातील मोटारचालकाने सीटबेल्ट लावल्याने त्याला काही दुखापत झाली नाही. मात्र, मोटारीतील सहप्रवासी अभियंता मृत्युमुखी पडला होता. मोटार ज्या वाहनावर आदळली. त्या वाहनाच्या मागील बाजूला धडकून अभियंता मृत्युमुखी पडला होता. अभियंत्याने सीटबेल्ट न वापरल्याने त्याचा मृत्यू झाला तसेच अभियंत्याला सीटबेल्ट लावण्याची सूचना संबंधित मोटारचालकाने देणे गरजेचे होते. मोटार वाहन कायद्यानुसार प्रवाशांच्या सुरक्षितेतची जबाबदारी मोटारचालकावर येते, अशी माहिती महामार्ग पोलिसांच्या पुणे विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

मोटार चालकांबरोबर सहप्रवाशांनी सीटबेल्ट वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे एखाद्या मोटारीतील प्रवाशाने सीटबेल्ट न लावल्यास प्रवाशाकडून दंड वसूल न करता चालकाकडून दंड आकारण्यात येतो. महामार्ग पोलीस दलाच्या प्रमुखपदाची सूत्रे पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी महिनाभरापूर्वी स्वीकारली. महामार्ग पोलीस दलाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक असलेल्या शुक्ला यांनी आसनपट्टा लावल्याने गंभीर स्वरूपाची दुखापत टळू शकते, याकडे लक्ष वेधले आहे.

चालक, सहप्रवाशांचे आधी प्रबोधन

महिनाभरापासून महामार्ग पोलिसांच्या पुणे विभागाकडून द्रुतगती मार्गावर सीटबेल्ट न वापरणारे मोटारचालक आणि सहप्रवाशांचे प्रबोधन केले. सुरुवातीचे पंधरा दिवस पोलिसांनी द्रुतगती मार्गावर प्रत्यक्ष कारवाई न करता वाहनचालक तसेच प्रवाशांना सीटबेल्ट वापरण्याचे महत्त्व समजावून सांगितले. गेल्या आठवडय़ापासून सीटबेल्टची कारवाई तीव्र करण्यात आली आहे. द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाक्यावर महामार्ग पोलिसांच्या पथकाकडून कारवाई करण्यात येते. ही कारवाई धावत्या वाहनांवर करण्यात येत नाही. महामार्ग पोलिसांच्या पुणे विभागाचे अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेनंतर  टोलनाक्यावर दिवसा, सायंकाळी आणि रात्री तीन पोलिसांचे पथक कारवाईसाठी नेमण्यात आले आहे. उर्से टोलनाका भागात दररोज पन्नास मोटारींवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांत साडेसातशे मोटारींवर कारवाई करण्यात आली असून दीड लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

* सीटबेल्टमुळे अपघातात होणारी दुखापतीची तीव्रता कमी

* द्रुतगती मार्गासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडय़ात सीटबेल्टची कारवाई

* महामार्ग पोलिसांच्या अखत्यारीतील ११ जिल्ह्य़ांत कारवाई तीव्र

* मोटारचालकांबरोबर सहप्रवाशांनी सीटबेल्ट वापरण्याचे आवाहन

* सहप्रवाशांची सुरक्षा मोटारचालकावर, त्यामुळे मोटारचालकावर दंडाची कारवाई