विजय हजारे ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एकाच ओव्हरमध्ये सात षटकार मारून विश्वविक्रम केल्याने सर्व स्तरातून त्याच कौतुक होत आहे. ऋतुराजला भारतीय संघात संधी मिळायला हवी. तो आगामी वन-डे विश्वचषकात नक्की दिसेल अशी आशा ऋतुराजचे प्रशिक्षक आणि वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीचे वरिष्ठ प्रशिक्षक मोहन जाधव यांनी व्यक्त केली आहे. ते लोकसत्ता ऑनलाइनशी बोलत होते. ऋतुराज ला एकापाठोपाठ शतकी खेळायची सवय आहे. त्याचा भारतीय संघाला फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रशिक्षक मोहन जाधव म्हणाले की, ऋतुराज वयाच्या ११ व्या वर्षांपासून चांगली बॅटिंग करायचा. तो एक दिवस भारतीय संघासाठी खेळेल अस नक्की वाटायचं. ते त्याने सत्यात उतरून देखील दाखवलं आहे. ऋतुराज हा सलामीवीर आहे, त्याने अनेक सामने स्वतः च्या बळावर जिंकवून दिले आहेत. विनय आणि ऋतुराज ची सलामी जोडी असायची. त्यांनी एका सामन्यात सलामीसाठी ५१२ धावांची भागीदारी केलेली आहे. पैकी ऋतुराजने ३०९ धावा ठोकल्या होत्या. त्याला सातत्य टिकवून खेळायला आवडतं अस प्रशिक्षक मोहन जाधव ह्यांनी सांगितलं.
ऋतुराज हा भारतीय संघ आणि आयपीएल साठी गेली काही वर्षे खेळतोय. एकाच षटकात सात षटकार मारले ही कामगिरी पाहिल्यानंतर वाटतं की त्याला भारतीय संघात पुन्हा संधी मिळायला हवी. सातत्य टिकवून तो भारतासाठी खेळेल अशी आमची खात्री आहे. सलामीला येऊन संघाला जिंकवण्याचा त्याचा नेहमी प्रयत्न असतो. तो पुढील भारतात होणाऱ्या वन-डे विश्वचषकात नक्की दिसेल. ऋतुराजवर भारतीय संघाने विश्वास दाखवायला हवा. आज तो टीमबाहेर आहे. पण, तो ज्यावेळी टीममध्ये येईल तेव्हा तो सातत्य टिकवून खेळेल. आम्ही त्याचे अनेक सामने पाहिले आहेत की त्यात त्याने लागोपाठ शतक खेळी केलेली आहे, अशी आठवण देखील त्यांनी सांगितली.