निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून प्रचारफलक काढण्यास सुरुवात

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक जाहीर होताच गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेले ‘फ्लेक्स युद्ध’ बुधवारी थंडावले. शहर विद्रूप करण्यात हातभार लावणारे शेकडो फ्लेक्स महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळपासूनच हटविण्यास सुरुवात केली होती. शहरामध्ये ठिकठिकाणी लावलेल्या फ्लेक्सच्या सांगाडय़ांचे ढीग रचून त्या-त्या क्षेत्रीय कार्यालयासाठी देण्यात आलेल्या जागांवर ठेवण्यात आले आहेत.

पिंपरी महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे बुधवारी निवडणूक आयोगाने जाहीर केले. मात्र, बुधवारी सकाळपासूनच निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणूक जाहीर करणार असल्याचा संदेश समाजमाध्यमांवर फिरत होता. शिवाय महापालिकेच्या निवडणूक यंत्रणेलाही ही माहिती मिळाली होती. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच फ्लेक्स हटविण्याची मोहीम हाती घेतली होती. महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या प्रभागांमधील अनधिकृत फ्लेक्स बुधवारी काढून घेण्यात आले. क्षेत्रीय कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांनी काढून टाकलेल्या फ्लेक्सच्या सांगाडय़ांचे ढीग मोठय़ा प्रमाणात लागले होते.

निवडणूक जवळ येऊ लागताच शहरामध्ये निवडणुकीचे वातावरण तयार होऊ लागले होते. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांनी शहरामध्ये अनधिकृत फ्लेक्स लावण्याचा धडाका लावला होता. अनेक ठिकाणी विरोधी इच्छुक उमेदवारांचे फ्लेक्स रात्रीत काढून त्या ठिकाणी स्वत:चा फ्लेक्स लावण्याचे प्रसंग घडल्यामुळे त्यातून वादही झाले होते. शहरातील रस्ते, सोसायटय़ा आदी सर्वच ठिकाणी इच्छुकांकडून अनधिकृत फ्लेक्स लावण्यात आले होते. निवडणुकीच्या घोषणेमुळे आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी शेवटी हे फ्लेक्स पालिकेला काढावे लागले.