‘इग्नायटेड इनोव्हेशन्स २०१३’ मध्ये सिओईपीने बाजी मारली असून विविध गटांमध्ये मिळून ७ बक्षिसे महाविद्यालयाने मिळवली आहेत, तर ‘बेस्ट फिलॉथ्रॉपिस्ट’ म्हणून औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला गौरवण्यात आले आहे.
इग्नायटेड इनोव्हेशन्स हा उपक्रम भाऊ इन्स्टिटय़ूट अॅट सिओईपी आणि इटॉन कॉर्पोरेशनचा उपक्रम आहे. यामध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी विविध विषयांवर प्रकल्प सादर करतात. अभियांत्रिकी विद्याशाखेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना समाजाशी जोडण्याच्यादृष्टीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यावर्षी या उपक्रमामध्ये राज्यभरातील ५३ महाविद्यालयांमधून २१३ प्रकल्प सादर करण्यात आले होते. आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान, शेती, पर्यावरण आणि इतर अशा गटांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केले होते. कमी उत्पन्न गटातील मुलींचे आरोग्य, मनोरूग्णांचे आरोग्य, अनाथ मुलांसाठी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणे, जनरिक मेडिसिन अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केले होते. यामध्ये बेस्ट फिलॉथ्रॉपिस्ट म्हणून औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला पुरस्कार देण्यात आला. तर बेस्ट अॅम्बॅसिडरचे पुरस्कार सिओईपी, विश्वकर्मा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय यांनी पटकावले.