पुणे : मेट्रो स्थानकांचे संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करुन सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने याबाबतचा अहवाल अखेर महामेट्रोला गुरूवारी सादर केला. या अहवालाला विलंब झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मेट्रो स्थानके सुरक्षित असल्याचा निर्वाळा अहवालात दिल्याचा दावा महामेट्रोने आता केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे मेट्रो स्थानकांच्या उभारणीत आढळलेल्या त्रुटी पुण्यातील काही ज्येष्ठ अभियंत्यांनी समोर आणल्या होत्या. मेट्रो स्थानकांच्या सुरक्षिततेबाबत दाखल जनहित याचिकेवर उच्च न्यायालयात १७ एप्रिलला सुनावणी झाली. त्या वेळी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करून सात दिवसांत अहवाल सादर करण्यात येईल, असे न्यायालयाला सांगितले होते. यानुसार, विद्यापीठाकडून मेट्रोच्या वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावरील स्थानकांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले.

हेही वाचा >>> “…तर वाहन उद्योग पोहोचेल प्रथम स्थानी”; गडकरींनी दिला कानमंत्र, म्हणाले…

विद्यापीठातील प्राध्यापक बी.जी. बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली हे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यात काही प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांचा समावेश होता. बिराजदार यांनी मेट्रोला स्ट्रक्चरल ऑडिटचा पाहणी अहवाल सादर केला होता. या अहवालात मेट्रो स्थानकांबाबत काही तांत्रिक मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. त्याला महामेट्रोकडून उत्तर देण्यात आले. त्यानंतर पुन्हा तपासणी करून अखेर अंतिम अहवाल महामेट्रोला सादर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

– मेट्रोची स्थानके सुरक्षित असल्याचा स्पष्ट निर्वाळा अहवालात दिल्याचा महामेट्रोचा दावा

– सीओईपीच्या पथकाकडून स्थानकांना भेट देऊन त्यांचे निरीक्षण

– स्थानकांच्या संरचनेचे विश्लेषण करून त्यांच्या भूकंपरोधक क्षमतेची पडताळणी – मेट्रो स्थानकांची पर्याप्त सुरक्षेद्वारे आखणी करण्यात आल्याचे अहवालात निरीक्षण

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coeptu conducted structural audit of metro stations and submitted report to mahametro pune print news stj05 zws