पुणे : उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीच्या लाटांचा कहर कायम आहे. काही भागांमध्ये तापमान गोठणबिंदूच्या खाली आले आहे. मात्र, गुरुवारपासून (१९ जानेवारी) उत्तरेकडील बहुतांश भागात तापमानात वाढ सुरू होणार आहे. परिणामी महाराष्ट्रातील तापमानातही वाढ सुरू होणार असून, ते सरासरीच्या जवळपास स्थिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील थंडीही स्थिरावणार आहे. सध्या थंडीच्या लाटांनी दिल्लीला हैराण केले आहे. जानेवारीमध्ये दिल्लीतील तब्बल आठ दिवस थंडीच्या लाटांचे ठरले. दिल्लीत २.६ अंशांच्या आसपास तापमान आहे.
हेही वाचा >>> पुणे : महापालिकेकडून सुशोभीकरणासाठी प्लास्टिक पताकांचा वापर, जी २० परिषदेत चर्चा पर्यावरणावर
एकापाठोपाठ सुरू असलेल्या पश्चिमी चक्रवातांमुळे उत्तरेकडे यंदा जानेवारीमध्ये सर्वाधिक काळ थंडीची लाट कायम राहिली आहे. थंडीबरोबरच काही भागांत दाट धुके पडत आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशसह पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आदी भागामध्ये दीर्घकाळ थंडीची स्थिती आहे. त्याचा परिणाम मध्य प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत झाला आहे. जानेवारीमध्ये उत्तरेकडे थंडीची लाट असताना तेथून महाराष्ट्राच्या दिशेने थंड वाऱ्यांचे प्रवाह सुरू आहेत. त्याचवेळेला राज्यात थंडीला पोषक निरभ्र आकाशाची स्थिती राहिली. त्यामुळे राज्यातील बहुतां भागात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात मोठी घट होऊन थंडी अनुभवता आली. आता उत्तरेकडील थंडीची लाट कमी होत आहे. गुरुवारपासून या भागात २ ते ३ अंशांनी तापमानात वाढ होणार आहे. परिणामी महाराष्ट्रातही काही प्रमाणात तापमानात वाढ होऊ शकेल.
हेही वाचा >>> खासदार गिरीश बापट रुग्णालयातून थेट जनसंपर्क कार्यालयात !
सध्या राज्याच्या बहुतांश भागात रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या जवळ आहे. मुंबई परिसर, पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी,, जळगाव, सातारा आदी भागांत किमान तापमान सरासरीच्या तुलनेत १ ते २ अंशांनी कमी आहे. त्यामुले या भागात रात्री गारवा आहे. बुधवारी औरंगाबाद येथे राज्यातील नीचांकी ९.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातील तापमानात २२ जानेवारीपर्यंत २ ते ४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही काळ तापमान स्थिर राहणार आहे. त्यामुळे राज्यात तापमानातील मोठ्या प्रमाणावरील चढ-उतार कमी होऊन थंडी स्थिरवण्याची शक्यता आहे. दिल्लीत २.६ अंशांच्या आसपास तापमान आहे. पंजाब, चंडीगड, राजस्थान आदी भागांतही थंडीचा कहर आहे. काही ठिकाणी गोठणबिंदूच्या खाली तापमान गेले आहे. राजस्थानच्या सिकर आणि चुरू येथे अनुक्रमे १.५, १.२ उणे तापमान आहे. पंजाबमधील भटिंडा येथेही ०.२ उणे तापमान असून,चंडिगड येथे ३.३ अंश तापमानाची नोंद झाली. श्रीनगरमध्ये उणे ४.३, तर याच विभागात डोंगराळ विभागात उणे १० ते १२ अंशांपर्यंत तापमानाचा पारा खाली आला आहे.