उत्तरेकडून येणाऱ्या थंड व कोरडय़ा वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रात जाणवू लागला असून, त्याचा परिणाम म्हणून मध्य महाराष्ट्र व विदर्भात थंडीची लाट पसरली आहे. पुणे येथे या हंगामातील सर्वात कमी ६.८ अंशांची नोंद झाली, तर नगर येथे राज्यातील या हंगामातील नीचांकी ५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन-तीन दिवस असेच वातावरण कायम राहील असे वेधशाळेकडून सांगण्यात आले.
राज्याच्या हवामानावर सध्या उत्तरेकडील प्रभाव आहे. तिकडून येणाऱ्या थंड व कोरडय़ा वाऱ्यांमुळे येथील तापमानात बरीच घट झाली आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र व विदर्भात त्याचा अधिक परिणाम जाणवत आहे. पुणे, नगरप्रमाणेच नाशिक तसेच, विदर्भात अमरावती, यवतमाळ, मराठवाडय़ात नांदेड, परभणी या पट्टय़ात तापमानात मोठी घट झाली आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार, पुढील दोन-तीन दिवस गारठा कायम राहणार आहे. त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होईल. पाठोपाठ, हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढून तापमानात थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उत्तर भारतात पंजाब, हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार या संपूर्ण पट्टय़ात मोठय़ा प्रमाणावर धुक्याचे वातावरण आहे. त्याचा रस्ते व रेल वाहतुकीवर परिणाम झाला.
राज्यातील विविध ठिकाणी शनिवारी नोंदवले गेलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअसमध्ये), ते सरासरीपेक्षा किमीत कमी किंवा जास्त आहे हे कंसात दिले आहे-
मध्य महाराष्ट्र :
पुणे ६.८ (-४.४), अहमदनगर ५.६ (-६.६), सातारा ८.३ (-५). सांगली १२.७ (-१.९), कोल्हापूर १५ (-०.६), महाबळेश्वर ११.९ (-१.६), नाशिक ६.६ (-३.८), मालेगाव ९ (-१.९), सोलापूर १२.१ (-३.५)
कोकण :
मुंबई कुलाबा २१ (+०.१), सांताक्रुझ १७.७ (-१), अलिबाग १६.४ (-२.२), पणजी २० (-१.२), डहाणू १५.३ (-२.९)
मराठवाडा :
उस्मानाबाद १०.४ (-३.२), औरंगाबाद ९.६ (-१.३), परभणी ८.७ (-४.७), नांदेड (-४.१), बीड १०.८ (-१.३)
विदर्भ :
अकोला १०.२ (-२.८), अमरावती ९ (-६), बुलडाणा १३ (-१.४), ब्रह्मपुरी १२ (०), चंद्रपूर ११.६ (-१.४), गोंदिया ८.४ (-३.७), नागपूर ९.६ (-२.५), वाशिम ११.४, वर्धा १०.५ (-३), यवतमाळ ९.६ (-५.१)

Story img Loader