पुणे : वाढत्या थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. तापमानाचा पारा खाली घसरल्याने हृदयविकारासह श्वसनविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आधीपासून हे विकार असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.
हिवाळ्याचे थंड हवामान शरीरावर विविध प्रकारे परिणाम करते. विशेषतः हृदय व श्वसन यंत्रणांसाठी हा ऋतू आव्हानात्मक ठरतो. तापमानातील घट रक्तवाहिन्यांचे आकुंचन होण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे रक्तदाबात वाढ होऊन हृदयावरील ताण वाढतो. थंड हवेमुळे रक्तवाहिन्यांचे आकुंचन होऊन रक्तप्रवाह कमी होऊन हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. अंगात गारठा वाटणे किंवा छातीत दडपण जाणवणे ही लक्षणे हिवाळ्यात अधिक दिसून येतात. हृदयविकाराने ग्रस्त रुग्णांनी या काळात विशेष काळजी घ्यावी, असे खराडीतील मणिपाल हॉस्पिटलमधील हृदयविकारतज्ज्ञ डॉ. तन्मय येरमल (जैन) यांनी सांगितले.
हेही वाचा >>>सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण : सरकारवर प्रचंड दबाव, मुख्यमंत्र्यांनी दबावाला बळी पडू नये; प्रकाश आंबेडकर
श्वसन समस्यांसाठी हिवाळा अधिक जोखमीचा ठरतो. थंड व कोरडी हवा श्वसनमार्गांना त्रासदायक ठरते. दमा किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) असलेल्या रुग्णांना श्वास घेण्यास अडचण होते. थंड हवेमुळे फुफ्फुसांच्या नलिका आकुंचन पावतात, त्यामुळे खोकला, सर्दी, श्वास घेण्यातील अडथळा आणि छातीची घरघर यांसारख्या समस्या उद्भवतात. शिवाय हिवाळ्यात फ्ल्यू आणि विषाणूसंसर्गाचे प्रमाण वाढून श्वसनमार्गांवरील ताणही वाढतो, असे डॉ. येरमल यांनी नमूद केले.
याबाबत ससून सर्वोपचार रुग्णालयातील औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रोहिदास बोरसे म्हणाले की, थंडीच्या काळात सर्वसाधारणपणे सर्दी, खोकला, घशाला सूज असा त्रास दिसून येतो. हृदयविकार आणि श्वसनविकाराच्या रुग्णांना मात्र गंभीर स्वरूपाचा त्रास उद्भवतो. थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावत असल्याने हृदयविकाराचा झटक्यासह पक्षाघाताचा धोका वाढतो. तापमानात मोठी घट झाल्यास काही स्नायूंमधून काही द्राव स्रवतात आणि त्यांच्यामुळे मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
हेही वाचा >>>नव्या टपाल कार्यालयाचे उद्घाटन; बावधन आता पुणे ४११०७१
काळजी काय घ्यावी?
– बाहेर पडताना उबदार कपडे परिधान करावेत.
– शरीर थंड पडणार नाही याची काळजी घ्यावी.
– थंड हवेत बाहेर जाण्यापूर्वी तोंड व नाक झाकून घ्यावे.
– गरम पदार्थांचे सेवन करावे.
– पुरेशी विश्रांती घ्यावी.
– नियमित व्यायाम करावा.
– तंबाखू व धूम्रपान टाळावे.
– आधीपासून त्रास असलेल्या रुग्णांनी नियमित तपासणी करावी.
थंडीच्या काळात हृदयविकार आणि श्वसनविकाराच्या रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना हे विकार असल्यास त्यांनी ताबडतोब ते थांबवावे. कारण धूम्रपानामुळे या विकारांचा धोका अधिक वाढण्याची शक्यता असते.- डॉ. रोहिदास बोरसे, प्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग, ससून सर्वोपचार रुग्णालय