नैर्ऋत्य मान्सून अर्थात मोसमी वारे राज्याच्या बहुतांश भागातून माघारी परतले असून, त्याचबरोबरच कोकणाचा काही भाग वगळता महाराष्ट्रातून पावसाची अखेर झाली आहे. त्यामुळे या वेळच्या दिवाळीत थंडी दाटण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, मान्सून पुढील तीन-चार दिवसांत संपूर्ण देशातून बाहेर पडेल, अशी शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.
मान्सून दोनच दिवसांपूर्वी म्हणजे गुरुवारी दिल्लीसह वायव्येकडील भागातून माघारी परतला. त्यानंतर शनिवारी तो देशाच्या बऱ्याचशा भागातून बाहेर पडला. त्यात दक्षिण कोकणातील काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्राचाही समावेश आहे. आता ईशान्य भारत, दक्षिणेकडील केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश ही राज्ये तसेच, पश्चिम बंगाल, ओरिसा या राज्यांचा काही भाग त्याच्या प्रभावाखाली आहे. मात्र, त्याचा परतीचा प्रवास पाहता येत्या मंगळवापर्यंत तो संपूर्ण देशातून बाहेर पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
या घडामोडीमुळे महाराष्ट्रातून पावसाचीही अखेर झाली आहे. हवामानाच्या अंदाजानुसार, रविवारी दक्षिण कोकणातील काही भाग वगळता राज्यात इतरत्र पावसाची शक्यता नाही. पुढच्या आठवडय़ात तर महाराष्ट्रात पाऊस पूर्णपणे थांबलेला असेल. पाऊस वेळीच थांबल्यामुळे यंदाच्या दिवाळीत राज्यात थंडी दाटण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत तापमानात घट होत जाईल. अचानक काही अडथळा आला नाही तर दिवाळीत थंडी असेल, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
दुसऱ्या मान्सूनची सुरुवात
संपूर्ण भारत व्यापणारा नैर्ऋत्य मान्सून आता थंडावण्याची चिन्हे आहेत. त्याच वेळी दक्षिण भारतात भरपूर पाऊस देणारा ईशान्य मान्सून सक्रिय होत आहे. येत्या मंगळवापर्यंत या मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल आणि तामिळनाडू, केरळ तसेच, कर्नाटक व आंध्र प्रदेशच्या काही भागात चांगलाच पाऊस सुरू होईल, असे हवामान विभागाने जाहीर केले आहे. या पावसाचा प्रभाव सामान्यत: डिसेंबर महिन्यापर्यंत कायम राहतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा