रात्रीच्या वेळी कितीही थंडी असली, तरी दुपारच्या वेळी पडणारे स्वच्छ ऊन. ही पुण्यातील हिवाळ्याची ओळख. सकाळी उशिरापर्यंत धुके दाटले, तरी ते दुपारी उन्हाची सोनेरी झाक अनुभवायला मिळतेच. मात्र, गेले आठवडाभर पुणेकरांना थंडीचा उत्तर भारतीय अवतार अनुभवला मिळाला- रात्री थंडीचा कडाका आणि दिवसभर सूर्याच्या दर्शनाचा अभाव. त्यामुळेच किमान तापमान बरेच खाली गेले आणि पुण्यात हंगामातील नीचांकी तापमानाची (८.३ अंश) नोंदही झाली.. आता हे चित्र बदलले असून, बुधवारपासून पुन्हा दुपारचा स्वच्छ सूर्यप्रकाश अनुभवायला मिळणार आहे.
भारतातील थंडीचे अनेक अवतार आहेत. त्यापैकी दिल्लीसह उत्तर भारतातील वैशिष्टय़ म्हणजे दिवसभर दाटणारे धुके. गेले काही आठवडे तेथे हेच अनुभवायला मिळाले. अजूनही धुक्यामुळे विमानसेवा, रस्ते-रेल्वे वाहतूक आणि एकूणच जनजीवनावर विपरीत परिणाम कायम आहे. पुण्यासह महाराष्ट्रात अशी स्थिती अपवादानेच असते. रात्रीच्या वेळी धुके पडले, तरी ते दिवसभर कायम राहत नाही. मात्र, गेले आठवडाभर पुण्यातही उत्तर भारताचे हवामान अवतरल्याचे पाहायला मिळाले. दिवसभर धुके आणि ढगांचे पातळ आवरण कायम असायचे. त्यामुळे सूर्यप्रकाश आणि त्यामुळे मिळणारी ऊब गैरहजर होती. त्यातच उत्तर आणि वायव्य (उत्तर-पूर्व) दिशांकडून थंड व कोरडे वारे येत होते. ते थंडीमध्ये भर घालत होते. पुण्यासह राज्याच्या काही भागात असेच हवामान कायम होते. त्याचाच परिणाम अनेक ठिकाणी रात्रीचे तापमान बरेच खाली उतरले. पुण्यात ८.३ अंश, अहमदनगर येथे ५ अंश असा अनेक ठिकाणी हंगामातील नीचांक नोंदवला गेला. त्याचबरोबर दुपारचे तापमानही सरासरीपेक्षा कमी नोंदवले गेले. रात्री थंडीचे राज्य आणि दिवसासुद्धा उन्हाचा दिलासा नाही, यामुळे हुडहुडीचा अनुभव पुणेकरांनी घेतला.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, गेले आठवडाभर हवामानाची स्थिती वेगळी होती. या दिवसांत सामान्यत: उत्तर व मध्य भारतावर ‘अँटी-सायक्लॉन’ स्थिती असते. हे ‘अँटी-सायक्लॉन’ गेले काही दिवस मध्य प्रदेश व विदर्भ या प्रदेशावर सरकले होते. त्याचा परिणाम म्हणून पुण्यासह महाराष्ट्राला या उत्तर भारतीय थंडीचा सामना करावा लागला. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे दुपारचे ऊन अनुभवायला मिळेल आणि दुपारच्या तापमानात वाढही होईल.
 हे अपवादानेच घडते
पुण्यात गेल्या आठवडाभरात असलेली स्थिती यापूर्वीसुद्धा उद्भवली होती. मात्र, असे अपवादाने घडते. थंडीतील नियमित हवामानात काही बदल झाले तर त्याचा अनुभव येतो.
– पुणे वेधशाळा

Story img Loader