उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यामुळे राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. अनेक शहरातील तापमान तीन ते चार अंशांनी खाली आले आहे. येत्या चोवीस तासांत थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. पुण्यातील तापमान पाच अंशांनी खाली आले असून शनिवारी पुण्यातील किमान तापमान ७.१ नोंदले गेले, तर राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिक येथे (६.९ अंश सेल्सिअस) झाली.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यामुळे किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली होती. अनेक ठिकाणी तर तापमान सरासरीच्या पुढे गेल्यामुळे थंडी जाणवत नव्हती. मात्र, आता पुन्हा उत्तरेकडील थंड वारे राज्याकडे वाहू लागले आहेत. तसेच सध्या हवामान निरभ्र असल्यामुळे थंड वाऱ्यांचा प्रभावही चांगलाच जाणवत आहे. त्यामुळे कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय रीत्या घटले आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ातील तापमानही सरासरीच्या किंचित खाली आले आहे. त्यामुळे थंडीचा कडाका पुन्हा वाढला आहे.
पुणे शहरात दोन दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणामुळे तापमान १३ अंशांच्या वर गेले होते. शुक्रवारी तपामान १२ अंशांवर आले. त्यानंतर शनिवारी तापमानात पाच अंशांनी घट झाली. त्यामुळे शहरातून गायब झालेली थंडी पुन्हा अवतरली आहे. सायंकाळपासूनच थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. थंडीचा हा कडाका आणखी काही दिवस राहणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. राज्यातील शनिवारचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे राहिले:- अहमदनगर ९.७, जळगाव १०.७, महाबळेश्वर ११.५, मालेगाव ९.५, सातारा ९.२, रत्नागिरी १५, सांताक्रुज १३.६, मुंबई १६, अलिबाग १४.४, उस्मानाबाद १२.६, औरंगाबाद १०, बीड १३.२, अमरावती १०.६ आणि नागपूर १६.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा