पुण्यातील थंडीचा कडाका आणखी वाढला असून शुक्रवारी शहरात ७.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. शनिवारपासून तापमान किंचित वाढण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला असला तरी पुढचे दोन दिवस थंडीची हुडहुडी कायमच राहण्याची शक्यता आहे.
राज्यात कमी तापमानात पुण्याचा पाचवा क्रमांक लागला आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ३.९ अंशांची घट झाली आहे. दिवसाही गारवा कायम राहात आहे. शुक्रवारी पुण्यात २५.८ अंश कमाल तापमानाची नोंद झाली असून ते सरासरीपेक्षा ४.३ अंशांनी कमी आहे. सध्या राज्यभर हवामान कोरडे आहे. मात्र पुण्यात पुढचे तीन दिवस हवामान ढगाळ राहणार असून त्यानंतर आकाश पुन्हा निरभ्र होईल, असा वेधशाळेचा अंदाज आहे. शनिवारी किमान तापमान ८ अंश, तर रविवारी ९ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता असून त्यामुळे रविवापर्यंत तरी थंडीचा कडाका कमी होणार नसल्याची चिन्हे आहेत.
राज्यभर ठिकठिकाणी कडाक्याची थंडी कायम राहिली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात जवळपास सगळीकडेच किमान व कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी आहे. नाशिकमध्ये शुक्रवारी सर्वात कमी (५.५ अंश सेल्सिअस) किमान तापमानाची नोंद झाली, तर ६.५ अंश किमान तापमानासह गोंदिया द्वितीय क्रमांकावर राहिले. नांदेड आणि नगरचे किमान तापमान ७ अंश व नागपूरमध्ये ते ७.१ अंश होते. मुंबईत शुक्रवारी १७.४ अंश किमान तापमानाची नोंद झाली. २२ तारखेला मराठवाडा व विदर्भात, तर २३ तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट राहण्याची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

Story img Loader