गेल्या दोन महिन्यांत थंडीने पुण्यात काहीच दिवस केलेला मुक्काम आणि अधिक काळ तुलनेने जास्तच राहिलेले तापमान याचा पुणेकरांना दुसऱ्या अर्थाने फायदाच झाला आहे. अधिक थंडी नसल्यामुळे गत वर्षीपेक्षा या वर्षी हवेतील कणीय प्रदूषणाचे प्रमाण घटल्याचे दिसून आले आहे. मुंबईत मात्र याच्या उलट स्थिती असून मुंबईचे तापमान यंदा कमी राहिल्यामुळे तिथे कणीय प्रदूषणाची पातळी नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबर व जानेवारीत वाढली आहे.
हवेतील कणीय प्रदूषणाची पातळी कमी-जास्त असणे हे त्या परिसरात होणारे प्रदूषण, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग आणि हवामानाशी संबंधित इतर गोष्टींवर अवलंबून असते. हिवाळ्यात मात्र कणीय प्रदूषणावर प्रामुख्याने थंडीचा परिणाम होतो. ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी’च्या (आयआयटीएम) ‘सफर’ या प्रदूषणमापन यंत्रणेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. गुफरान बेग यांनी दिलेल्या कणीय प्रदूषणाची आकडेवारीनुसार गेल्या वर्षीपेक्षा यंदा त्यात घट झाल्याचे दिसते आहे.
‘सफर’च्या वरिष्ठ प्रकल्प अधिकारी नेहा पारखी म्हणाल्या, ‘तापमान कमी झाले की वातावरणात ठरावीक उंचीवर असणाऱ्या हवेच्या ‘बाउंड्री लेअर’ची उंची कमी होते आणि त्यामुळे हवा प्रदूषणाची पातळी वाढते. तापमान अधिक असते, तेव्हा याच बाउंड्री लेअरची उंची वाढते आणि प्रदूषकांना पसरायला वाव मिळून प्रदूषणाची पातळी कमी होते. पुण्यात यंदा हिवाळ्यात तापमान अधिक राहिल्याने प्रदूषण गत वर्षीच्या तुलनेत कमी राहिले.’
———-
प्रति घनमीटर हवेत १० मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी व्यासाच्या कणांचे प्रमाण किती (सूक्ष्म कण), तसेच २.५ मायक्रोमीटर वा कमी व्यासाच्या कणांचे प्रमाण किती (अतिसूक्ष्म कण), हे मोजून हवेतील कणीय प्रदूषण काढले जाते. या प्रदूषणाची पुण्यातील आकडेवारी खालीलप्रमाणे-
कणीय प्रदूषण डिसें. १४ डिसें. १५ जाने. १५ जाने. १६
(मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर मध्ये)
सूक्ष्म कण १५६ १२१ १४२ १३१
अतिसूक्ष्म कण ८१ ६४ ७५ ६९ मुंबईत प्रदूषण वाढले!
मुंबईत ‘सफर’ यंत्रणेद्वारे कणीय प्रदूषणाचे आकडे घेण्यास जून २०१५ पासून सुरुवात झाली. मुंबईत मागील वर्षीच्या थंडीतल्या प्रदूषणाशी तुलना करणारी आकडेवारी उपलब्ध नसली, तरी तिथे सूक्ष्म व अतिसूक्ष्म कणांचे प्रदूषण नोव्हेंबरपासून जानेवारीपर्यंत वाढल्याचेच दिसते आहे. मुंबईत एरवी कधी न पडणारी थंडी या वर्षी पडल्याचा हा परिणाम असावा, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. नोव्हेंबरमध्ये मुंबईत सूक्ष्म कणांचे प्रदूषण १३३ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर होते. डिसेंबरमध्ये ते १५८ व जानेवारीत १५९ झाले. अतिसूक्ष्म कणांचे प्रमाणही वाढले असून नोव्हेंबरमध्ये ते ९० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर होते, तर डिसेंबरमध्ये ते ११० व जानेवारीत ११४ झाले.