हंगाम संपवून जाण्याच्या मार्गावर असलेल्या थंडीने जाता जाता राज्याला पुन्हा एकदा गारठून सोडले आहे. दिल्ली, हरयाणासह उत्तर भारतात थंडी वाढली आहे, तिचा प्रभाव म्हणून कोकणापासून ते विदर्भापर्यंत सर्वत्र तापमान बरेच खाली उतरले आहे. विशेष म्हणजे, किमान तापमानाबरोबरच दिवसाच्या कमाल तापमानातही घट झालेली आहे. मंगळवारसुद्धा थंडीचाच असणार आहे, त्यानंतर मात्र वातावरणातील ऊब वाढण्यास सुरुवात होईल, असा वेधशाळेचा अंदाज आहे. सोमवारी नाशिक व नगर येथे पारा ७.६ अंशांपर्यंत, तर पुण्यात ७.८ अंशांपर्यंत उतरला होता.
जानेवारी महिन्याची अखेर व फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात सर्वच भागात तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये थंडी गायब होणार की काय, अशीच स्थिती होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा स्थिती बदलली आणि तापमान खाली यायला सुरुवात झाली. उत्तरेकडील वाऱ्यांचा परिणाम म्हणून दिल्ली, हरयाणा, गुजरात या भागात थंडीची लाट पसरली आहे. दिल्लीत ४.४ अंश, तर हरयाणात नामौल येथे २.५ अंशांची नोंद झाली. कोकणापासून ते विदर्भापर्यंत सर्वच भागात पारा सरासरीच्या खाली उतरला आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान १० अंशांच्या खाली नोंदवले गेले. वेधशाळेच्या अंदाजानुसार, मंगळवारी थंडी तीव्र राहील. त्यानंतर मात्र तापमानात वाढ व्हायला सुरुवात होईल. गेले काही दिवस दुपारी चांगलाच उकाडा जाणवत होता. मात्र, सोमवारी दुपारचे तापमानही खाली उतरले होते.
राज्याच्या विविध भागात सोमवारी नोंदवले गेलेले किमान तापमान असे (अंश सेल्सिअसमध्ये)-
मध्य महाराष्ट्र :
पुणे ७.८, नगर ७.६, जळगाव १०, महाबळेश्वर १२.२, मालेगाव १०.६, नाशिक ७.६, सांगली १३.४, सातारा ८.९, सोलापूर ८.९
कोकण :
मुंबई-सांताक्रुझ १५.४, कुलाबा १९, रत्नागिरी १५.५, डहाणू १४.८
मराठवाडा :
उस्मानाबाद १३.२, परभणी ११.७, औरंगाबाद १३.३, बीड १२.६
विदर्भ :
अकोला १२.५, अमरावती १४, बुलडाणा १४, गोंदिया १३.४, वर्धा १३.८, नागपूर १४.६, यवतमाळ १६.२

Story img Loader