उत्तरेकडून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांचा जोर ओसरला

उत्तरेकडून राज्याच्या दिशेने येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांच्या प्रवाहांमध्ये घट झाल्याने राज्याच्या बहुतांश भागातील किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीच्या लाटेची तीव्रता कमी झाली असली, तरी गारठा कायम आहे. पुढील काही दिवस गारठा कायम राहणार असून, उत्तर महाराष्ट्रामधील काही भागाला पुन्हा थंडीचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

राज्याच्या बहुतांश भागात गेल्या आठवडय़ात थंडीची लाट होती. उत्तरेकडील काही राज्यांमध्ये बर्फवृष्टी होत असल्याने त्याचा परिणाम म्हणून राज्याला थंडीचा तडाखा बसला. पुणे, नागपूर, नाशिक, नगर, औरंगाबाद आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणच्या तापमानाचा पारा गेल्या कित्येक वर्षांच्या तुलनेत नीचांकी पातळीवर आला होता. तापमानात मोठय़ा प्रमाणावर घट झाल्याने महाबळेश्वर, बुलडाणा, नगर आदी ठिकाणी दविबदू गोठल्याचे दिसून आले. थंडीच्या तडाख्याने द्राक्ष मणी तडकले, स्ट्रॉबेरी पिकांवर हिमकण जमा झाले. भाजीपाला आणि पिकांनाही धुके आणि थंडीचा फटका बसला. नववर्षांचे स्वागतही गुलाबी थंडीने झाले. मात्र, सध्या थंडीची लाट ओसरून किमान तापमानात किंचितशी वाढ झाली आहे.

मुंबईत गुरुवारी १८.५ अंश किमान तापमान होते. ते सरासरीच्या तुलनेत १ अंशांनी कमी असल्याने काहीसा गारवा आहे. मध्य महाराष्ट्र पुण्यामध्ये ८.४ अंश तापमानाची नोंद झाली. येथे गारवा कायम आहे. मध्य महाराष्ट्रात सध्या बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांपुढे गेला आहे. विशेष म्हणजे महाबळेश्वरमध्ये सध्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ अंशांनी वाढ झाली असून, तापमान १५ अंशांवर आले आहे. मराठवाडय़ात अनेक ठिकाणी १० ते ११ अंशांवर किमान तापमान आहे.

किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

मुंबई (कुलाबा) १८.५, सांताक्रूझ १४.७, रत्नागिरी १६.७, पुणे ८.४, नगर ६.०, जळगाव ७.०, कोल्हापूर १३.७, महाबळेश्वर १५.०, मालेगाव १०.४, नाशिक ७.६, सांगली ९.७, सातारा ९.४, सोलापूर १२.३, उस्मानाबाद ११.९, औरंगाबाद १०.८, परभणी १०.१, नांदेड १०.०, अकोला ९.७, अमरावती १२.६, बुलडाणा १२.४, ब्रह्मपुरी ९.०, चंद्रपूर १३.०, गोंदिया १०.०, नागपूर ८.२, वाशीम १२.२, वर्धा ११.० आणि यवतमाळ ११.४.

Story img Loader