राज्यात सर्वदूर तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. सलग दुसऱ्या दिवशी थंडीचा कडाका कायम असून पुढील २४ तासांत उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दिवसभरात राज्यात पुन्हा जळगाव शहराचे किमान तापमान ५.३ अंश सेल्सिअस एवढे नीचांकी नोंदविले गेले. मुंबई, सांताक्रुझ, कोकणातील अलिबाग, रत्नागिरी, डहाणू या भागातही थंडी वाढली आहे.
हेही वाचा- फुकट सिगारेट न दिल्याने पानपट्टी चालकावर तलवारीने वार; कोंढव्यातील घटना; दोघे अटकेत
हिमालयीन भागात ९ जानेवारीला पश्चिमी च्रकावात धडकला. या चक्रावाताचा प्रभाव वाढला असून मंगळवारी पाकिस्तानात चक्रीय स्थिती तयार झाली आहे. या चक्रीय स्थितीचा प्रभाव ११ जानेवारी रोजी हिमालयीन भागातील राज्यांसह पंजाब, हरियाणा, दिल्ली या भागावर जाणवणार आहे. ११ ते १४ जानेवारी या कालावधीत या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या उत्तर भारतातील सर्वच राज्यात दाट धुके आणि अतितीव्र थंडीची लाट कायम आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा एक अंश सेल्सिसच्या खाली गेला आहे, तर जम्मू काश्मीर, हिमालयीन भागात हिमवर्षाव होत आहे.
हेही वाचा- पुणे : शहरातील तीन हजार ७६५ गुन्हेगारांची झाडाझडती, पिस्तुलासह १४५ कोयते जप्त
उत्तर भारतात सुरू असलेल्या अतितीव्र थंडीमुळे या भागाकडून मध्यप्रदेश मार्गे जोरदार थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडली आहे. या थंडीमुळे तापमानाचा पारा सरासरीच्या खाली गेला आहे. विशेष करून उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, नाशिक, मालेगाव भागात उर्वरित राज्यापेक्षा किमान तापमानाचा पारा चांगलाच खाली घसरला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात किमान तापमान घसरले आहे. मुंबई, सांताक्रुझ, कोकणातील अलिबाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, डहाणू या भागातही थंडीचा कडाका वाढला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, या जिल्ह्यातही सलग दुसऱ्या दिवशी थंडीचा कडाका कायम आहे.
उत्तर भारतात अतितीव्र थंडी आणि दाट धुके पसरले आहे. त्यामुळे या भागाकडून राज्याकडे जोरदार थंड वारे वाहत आहेत. परिणामी राज्यात थंडीची लाट सुरू आहे. येत्या २४ तासांत उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांत थंडीची लाट येणार आहे. नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर ,गोंदिया, औरंगाबाद या जिल्ह्यात थंडीची लाट सुरूच आहे.
हेही वाचा- सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर, नवी दिल्लीचा हर्ष चौधरी देशात पहिला
प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये
शहर कमाल किमान
पुणे ३०.१ ७.४
जळगाव ३०.६ ५.३
मुंबई ३२.२ २०
नाशिक २९.४ ७.६
नागपूर ३०.७ ९.२
कोल्हापूर ३०.५ १४.२
सातारा ३१.५ १०
सांगली ३१.६ १२.२
सोलापूर ३३.७ १३.४
औरंगाबाद ३०.४ ७.७
रत्नागिरी ३४.४ १५.८