पुणे : हिवाळा म्हटले की छान गुलाबी थंडी, नव्याने केले जाणारे व्यायामाचे संकल्प आणि ताजा रसरशीत भाजीपाला, फळफळावळ हे चित्र जेवढे खरे तेवढेच वेगवेगळ्या आजारांनी काहीसे एकाच ठिकाणी जायबंदी होणेही खरेच. त्यामुळेच थंडी वाढण्याच्या हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर प्रकृती सांभाळण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तापमानाचा पारा घसरताच हवामानातील बदलांमुळे होणारे नेहमीचे विषाणूजन्य आजार आणि त्याबरोबरीने सांधेदुखी, दमा आणि इतर श्वसनविकार तसेच त्वचेच्या आणि अस्थिरोगांच्या विविध तक्रारी भेडसावण्यास सुरुवात होते. हिवाळ्यातील हे नियमित आजार टाळायचे असतील, तर पुरेशी विश्रांती, चौरस आहार, समतोल व्यायाम अशी जीवनशैली राखावी आणि कोणत्याही प्रकारच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घ्यावे, असेही डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> “देवेंद्रजी, माझ्या घरात जशी एक मुलगी, तशी तुमच्या घरातदेखील…”, उर्फी जावेद प्रकरणावरुन सुप्रिया सुळेंचे वक्तव्य

हिवाळ्याच्या आगमनाबरोबर श्वसनविकारांची पार्श्वभूमी असलेल्या रुग्णांना खोकला, सर्दी, घसा दुखणे, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसतात. ज्येष्ठांमध्ये सांधेदुखी, गुडघेदुखी, सांध्यांची आग होणे, सांध्यांच्या जागी लालसर चट्टे दिसणे असे त्रासही सर्रास दिसून येतात. जनरल फिजिशियन डॉ. सम्राट शहा म्हणाले, हिवाळ्यातील बदललेले हवामान हे प्रामुख्याने रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींसाठी चिंतेचे असते. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिला यांनी या काळात काळजी घ्यावी. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. चौरस आहार आणि विश्रांतीला प्राधान्य द्यावे.

हेही वाचा >>> ‘अनेक वेळा मला दादाच मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं’; सुप्रिया सुळे यांचे विधान

बालकांमध्ये सर्दी, खोकल्यात वाढ

बालरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश काथवटे म्हणाले, थंडीची सुरुवात झाल्यापासून लहान मुलांमध्ये सर्दी आणि खोकला या दोन गोष्टी प्रामुख्याने आढळत आहेत. बाह्यरुग्ण विभागात दररोज साधारण सहा ते आठ नवीन लहान मुले या तक्रारीसाठी येत आहेत. कोरड्या हवेमुळे संसर्गाचा प्रसारही वेगाने होतो. हिवाळी आजारांची लक्षणे सहसा उशिराने दिसतात. नाताळच्या सुट्टीनंतर शाळेत आलेल्या मुलांमध्येही विषाणूजन्य आजाराची लक्षणे आहेत, मात्र विश्रांती आणि औषधोपचारांनी ही मुले बरी होत आहेत, असेही डॉ. काथवटे यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cold will increase doctors appeal citizens take care health pune print news bbb 19 ysh