आधीच हिवाळा लांबला. ऐन दिवाळीत ढगाळ वातावरण अवतरले. पुढे थंडी पडेल म्हणता म्हणता गेल्या आठवडय़ात वादळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला. हवामानाचं नेमकं काय चाललंय काय, अशी शंका घ्यायला लावणारी स्थिती असताना आता पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात थंडीचे राज्य सुरू झाले असून, पुढील काही दिवस तरी थंडीचे दिवस कायम राहण्याची शक्यता वेधशाळेतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
पुणे शहराचे रविवार आणि सोमवार या दोन दिवसांच्या किमान तापमानावरून थंडी अचानक अवतरली असल्याचे पाहायला मिळते. कारण एकाच दिवसात पुण्याचे किमान तापमान तब्बल ७ अंश सेल्सिअसने उतरले. रविवारी सकाळी ते १८.२ अंशांवर होते, ते सोमवारी सकाळी ११.४ अंशांपर्यंत खाली आले. अशीच स्थिती आसपासच्या परिसराची आहे. तापमान उतरण्याबरोबरच बोचरे वारे वाहू लागले आहेत. त्याचा परिणाम म्हणून थंडीची तीव्रता आणखी वाढली आहे. पुण्याची सोमवारची दुपार अशीच हुडहुडी भरवणारी होती. अगदी उन्हात असतानासुद्धा गारवा जाणवत होता. सोमवारी वातावरणात काही प्रमाणात बाष्प होते. त्यात मंगळवारी आणि पुढच्या काळात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचा कडाका आणखीच वाढण्याची शक्यता आहे. बुधवार सकाळपर्यंत शहराचे किमान तापमान १० अंशांपर्यंत खाली येईल, असे पुणे वेधशाळेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.
पुणे आणि महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात गेल्या आठवडय़ात पूर्वेकडून वारे येत होते. ते सोबत बाष्प आणत असल्याने ढग-पाऊस यांचा प्रभाव पाहायला मिळाला. आता मात्र, या वाऱ्यांचा प्रभाव संपला आहे. आता स्वच्छ आकाश आणि उत्तरेकडून येणारे कोरडे वारे यांच्यामुळे थंडी वाढली आहे. सध्या गुजरातमध्ये थंडीची लाट पसरली आहे. तेथील तापमान ४ ते ७ अंशांनी खाली गेले आहे. त्यामुळे नजीकच्या नाशिक, मालेगावमध्ये तापमान अनुक्रमे ६.३ आणि ९ अंशांपर्यंत खाली आले. त्याचा परिणामही पुण्यातील गारठा वाढण्यावर झाला आहे. या आठवडय़ाभरात तरी थंडीचे राज्य कायम असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे या हंगामात पहिल्यांदाच सलग थंडीचा काळ अनुभवायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तो पुढे किती काळ कायम राहील, याबाबत उत्सुकता आहे.

नाशिक, नगरचा पारा घसरला
महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात गेल्या आठवडय़ात पूर्वेकडून वारे येत होते. ते सोबत बाष्प आणत असल्याने ढग-पाऊस यांचा प्रभाव पाहायला मिळाला. आता मात्र, या वाऱ्यांचा प्रभाव संपला आहे. सध्या गुजरातमध्ये थंडीची लाट पसरली आहे. त्यामुळे नाशिक, मालेगावमध्ये तापमान अनुक्रमे ६.३ आणि ९ अंशांपर्यंत खाली आले. याशिवाय अहमदनगर येथे तापमान १०.२ अंशांपर्यंत घसरले. या आठवडय़ाभरात तरी थंडीचे राज्य कायम असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

पुण्याच्या वेगवेगळ्या भागात सोमवारी नोंदवले गेलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे-
(आकडे अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे        ११.४
पाषाण         ११.०
लोहगाव    ११.७

Story img Loader