वीजबिलांच्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई तीव्र करण्यात आली असून, ‘महावितरण’ने दीड महिन्यात पुणे विभागात तब्बल ६५ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडला. या माहिमेत आजपर्यंत १ लाख ४७ हजार थकबाकीदारांकडून सुमारे ५२ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली.
थकबाकी भरण्यासाठी वेळोवेळी आवाहन करूनही बिले भरली जात नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषी पंप ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. पुणे, िपपरी-चिंचवड शहरांसह मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभागांमध्ये ही मोहीम सुरू आहे. जुलै महिन्यामध्ये या मोहिमेत १ लाख ६ हजार १३६ थकबाकीदारांनी ३८ कोटी ४६ लाख रुपयांचा भरणा केला होता. त्यात ४८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. तीन कोटी रुपयांच्या थकबाकीपोटी २२३० ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे.
ऑगस्ट महिन्यामध्येही ही मोहीम सुरू ठेवण्यात आली असून, मागील पंधरा दिवसांत पुणे विभागातील थकबाकीदारांनी १३ कोटी ३९ लाखांचा भरणा केला. मात्र थकीत वीजबिले भरण्याच्या आवाहनाला प्रतिसाद न देणाऱ्या व आठ कोटी २४ लाखांची थकबाकी असणाऱ्या १७ हजार २४१ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यात एक कोटी ३७ लाखांच्या थकबाकीपोटी ९८९ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. ही मोहीम यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार असल्याने संभाव्य कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी थकबाकीचा भरणा करावा, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे.

Story img Loader