लष्कराच्या दक्षिण कमांडतर्फे शनिवारी पुणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान मोहिमेत ७०० युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले आहे. देशातील ११ राज्यांतील ३३ शहरांमध्ये या रक्तदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय लष्करातील जवान आणि अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने सामान्य नागरिकांनी या मोहिमेत रक्तदान केले. लष्कराच्या दक्षिण कमांडचे मुख्यालय असलेल्या पुणे शहरातील कमांड रुग्णालय, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस (एआयसीटीएस) यांच्याबरोबरीने खडकी आणि खडकवासला येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये शनिवारी रक्तदान शिबिरे घेण्यात आली.
हेही वाचा- पुणे शहरात करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात; मुखपट्टीचा वापर करण्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे आवाहन
लष्करी जवान आणि अधिकारी, त्यांचे कुटुंबीय, संरक्षण विभागाच्या विविध कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचारी, एनसीसीचे छात्र, लष्करी शाळांचे शिक्षक आणि नागरिक यांनी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान केले. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि १५ जानेवारी २०२३ ला साजरा होत असलेला ७५ वा लष्कर दिन या निमित्ताने या देशव्यापी रक्तदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरामध्ये आपत्ती काळात रक्तदान करू शकणाऱ्या ७५ हजार रक्तदात्यांची माहिती संकलित करणे आणि आणि ७५०० युनिट एवढ्या रक्ताचे संकलन करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट होते.
हेही वाचा- पुणे : लोकसभा अध्यक्षांकडून गिरीश बापट यांच्या तब्येतीची चौकशी
लष्कराच्या दक्षिण कमांडच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, गुजराथ, मध्य प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधील मुंबई, पुणे, पणजी, जोधपूर, जैसलमेर, भूज, नाशिक, अहमदनगर, भोपाळ, झांशी, नशिराबाद, सिकंदराबाद, बंगळुरू आणि चेन्नई या शहरांमध्ये या शिबिरांचे आयोजन करण्यात आले. देशातील लष्कराचे जवान आणि अधिकारी तसेच सामान्य नागरिक यांच्यातील परस्पर संवाद वाढीस लावण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना या निमित्ताने अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांप्रति त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली.