पुणे रेल्वेकडून फुकट्या प्रवाशांवर होणारी कारवाई वाढली असून, यंदाच्या आर्थिक वर्षातील दंडाच्या वसुलीचे उद्दिष्ट सात महिन्यांच्या आतच पूर्ण करण्यात आले आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून तब्बल १४.६८ कोटी रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यातील कारवाईमध्ये २७ हजारांहून अधिक फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून २.३० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>हेल्मेट है जरुरी: गेल्या दहा महिन्यात १५७ विनाहेल्मेट दुचाकी चालकांचा अपघात होऊन मृत्यू
विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडण्यासाठी पुणे रेल्वेकडून विविध गाड्यांमध्ये तसेच फलाटावर सातत्याने तिकिटांची तपासणी केली जाते. त्याचप्रमाणे काही वेळेला तिकीट तपासणीची विशेष मोहीमही राबविली जाते. लांबपल्ल्याच्या गाड्यांसह पुणे-लोणावळा उपनगरीय रेल्वे, पुणे-दौंड डेमू आदी सेवांमध्येही सातत्याने तिकीट तपासणी केली जाते. त्याचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांमध्ये फुकटे प्रवासी पकडले जाण्याचे प्रमाण वाढले आहे. पुणे रेल्वेने यंदाच्या आर्थिक वर्षांत एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत विनातिकीट दोन लाख पाच हजारांहून अधिक प्रवाशांना पकडले असून, त्यांच्याकडून १४.६८ कोटी रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पुणे रेल्वेला देण्यात आलेले वार्षिक दंडवसुलीचे उद्दिष्ट पार झाले आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबरमधील कारवाईनंतर वार्षिक उद्दिष्टापेक्षा २२ टक्क्यांनी दंडाची वसुली अधिक झाली आहे.
हेही वाचा >>>पुणे: नागपूर संत्र्यांचा हंगाम सुरू; पावसाच्या तडाख्यामुळे आवक कमी
ऑक्टोबरमध्ये पुणे रेल्वेने केलेल्या कारवाईत २७ हजारांहून अधिक विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून २.३० कोटी रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सुमारे साडेपाच हजार प्रवाशांना अनियमित प्रवासासाठी ३२ लाख ८१ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. साहित्याचे योग्य तिकीट न काढणाऱ्या ३०० प्रवाशांकडून ४१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे रेल्वेच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली. तिकीट तपासणीची मोहीम सातत्याने सुरू असल्याने योग्य तिकीट काढून प्रवास करावा, अन्यथा दंडाची कारवाई आणि दंड न भरल्यास तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.