ई-कचरा आणि प्लास्टिक संकलन अभियनात रविवारी सोळा टन ई-कचरा, सहा टन प्लास्टिक, ७०० किलो थर्माकोल संकलन करण्यात आले. शहरातील तीनशे ठिकाणी अभियान राबविण्यात आले.पुणे महापालिकने कमिन्स इंडिया फाउंडेशन, आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह, जनवाणी, पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन, थंब क्रिएटिव्ह, सागरमित्र, मालक्ष्मी, इ-रिसायक्लर, के. के. नाग प्रा. लिमिटेड आदी संस्थांच्या मदतीने हा उपक्रम रविवारी राबविला. ई-कचरा आणि प्लास्टिकबाबत जनजागृतीही करण्यात आली. शैक्षणिक संस्थांकडूनही एक हजाराहून अधिक स्वयंसेवक अभियानासाठी दिले.
हेही वाचा >>>पुणे : दिवाळी खरेदीसाठी झुंबड मध्यभागात कोंडी
शिवाजीनगर येथील चित्तरंजन वाटिका येथून अभियनाला महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते प्रारंभ झाला. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उप आयुक्त आशा राऊत, स्वच्छ अभियनाचे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर डाॅ. सलील कुलकर्णी, ऋतुजा भोसले, कमिन्स इंडियाचे आर. एस. कुलकर्णी, सौजन्या वेगुरू यावेळी उपस्थित होते.ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करावे, असे आवाहन विक्रम कुमार यांनी केले. ई-कचरा संकलनासाठी शहरातील दोनशे उद्यानात ई-कचरा संकलन केंद्र सुरू करण्यात येईल, असे कुमार यांनी सांगितले. आशा राऊत यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.