पुणे : एनडीए चौकातील (चांदणी चौक) उड्डाणपुलाचे काम एप्रिलअखेरीस पूर्ण करण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाचे लोकार्पण महाराष्ट्र दिनी (१ मे) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कामाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख बुधवारी (१५ मार्च) घेणार आहेत.

सातारा-मुंबई महामार्ग, पाषाण, बावधन, मुळशी या सर्व भागांतील वाहतूक एनडीए चौकात एकत्र येते. या ठिकाणी एकच पूल असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे या ठिकाणी बहुमजली उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑगस्ट २०१७ मध्ये केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. हा पूल ऑगस्ट २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, भूसंपादनासह तांत्रिक अडचण, या चौकातील वाहतूक आणि करोना अशा विविध कारणांमुळे हे काम लांबणीवर पडले. त्यानंतर ३१ जानेवारी २०२३ ची मुदत देण्यात आली. त्यानंतर आता या पुलाचे काम एप्रिलअखेरीस पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

हेही वाचा – पुणे : खोदकामामुळे वारजे परिसरातील वीजवाहिन्यांचे नुकसान ; महावितरणसह वीजग्राहकांना फटका

हेही वाचा – पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता

केंद्रीय भूपृष्ठ मंत्री गडकरी यांनी नुकताच पुणे दौरा करून एनडीए चौकातील पूल, पालखी मार्गासह पुणे जिल्ह्यातील एनएचएआयच्या प्रकल्पांचा आढावा घेतला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. देशमुख या ठिकाणी भेट देऊन कामाचा आढावा घेणार आहेत. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) अधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहेत. पाषाण-एनडीए रस्ता यांना जोडणारा हा पूल गेल्या वर्षी २ ऑक्टोबरला मध्यरात्री नियंत्रित स्फोट करून पाडण्यात आला. त्यानंतर नव्या पुलाचा पाया आणि आता खांब उभारणीचे काम सुरू झाले आहे. चांदणी चौक, पाषाण, एनडीए रस्ता या दरम्यान महामार्गावर नवीन मोठ्या पुलासह एकूण आठ विविध मार्ग प्रस्तावित केले आहेत. त्यापैकी पाच मार्गांचे काम पूर्ण झाले आहे. अजून एका महामार्गावरील पूल, एक बावधनकडून साताऱ्याकडे जाणारा उड्डाणपूल आणि साताऱ्याकडून मुळशीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे काम अपूर्ण आहे.

Story img Loader