पुणे : मूळगावी निघालेल्या दुचाकीवरील सहप्रवासी महाविद्यालयीन युवतीचा भरधाव वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली. अपघातात दोन महाविद्यालयीन युवक जखमी झाले असून पसार झालेल्या वाहनचालकाच्या विरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा >>> “कलाटेंना अहंकार ते वीस हजारांच्या…” पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांची बंडखोर राहुल कलाटेंवर टीका
पलक शिवहारे (वय २०, सध्या रा. लोणी काळभोर) असे मृत्युमुखी पडलेल्या महाविद्यालयीन युवतीचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार चिन्मय नागेंद्रमणी पांडे (वय २१), सहप्रवासी भावेश पाटील जखमी झाले आहेत. याबाबत पांडे याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पलक, चिन्मय, भावेश लोणी काळभोरमधील एका शैक्षणिक संस्थेत शिकत आहेत. पलक मूळगावी निघाली होती. तिला पुणे रेल्वे स्थानकात सोडविण्यासाठी चिन्मय, भावेश दुचाकीवरुन निघाले होते. तिघे जण एकाच दुचाकीवरुन मध्यरात्री निघाले होते. पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी परिसरात भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. वाहनचालक अंधारात पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या पलकचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.