लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : हनुमान टेकडीवर फिरायला गेलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याला धमकावून त्याच्या गळ्यातील ३५ हजार रुपयांची सोनसाखळी चोरून नेल्याची घटना घडली.
याबाबत एका तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असून, तो महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहायला आहे. रविवारी दुपारी तो फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या हनुमान टेकडीवर फिरायला गेला होता. दुपारी पावणेचारच्या सुमारास टेकडीवर दोन चोरट्यांनी तरुणाला धमकावले. त्याला मारण्याीच धमकी देऊन चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील ३५ हजारांची सोनसाखळी चोरून नेली. घाबरलेल्या तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. पसार झालेल्या चोरट्यांचा पोलिासंकडून माग काढण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले तपास करत आहेत.
आणखी वाचा-पुणे : स्मशानभूमीतील लाकडावर रक्ताचे डाग; खुनाच्या गुन्ह्याला वाचा
बोपदेव घाटात मित्राबरोबर फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीला धमकावून तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्याची घटना घडली होती. बाणेर टेकडीवर इशान्येकडील विद्यार्थ्याला धमकावून त्याला लुटण्यात आले होते तसेच याच टेकडीवर फिरायला गेलेल्या इशान्यकेडील तरुणीस तिच्याबरोबर असलेल्या मैत्रिणींना लुटण्यात आल्याची घटना घडली होती. हनुमान टेकडीवर एका महाविद्यालयीन तरुणाावर कोयत्याने वार करुन लुटण्यात आल्याची घटना घडली होती. टेकड्यांवरील लुटमारीच्या घटनांमुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी टेकडीवर गस्त घालण्याचे आदेश दिले होते.
टेकड्यांच्या परिसरात प्रखर दिवे बसवण्याच्या सूचना दिल्या होत्या. शहरातील वेताळ टेकडी, हनुमान टेकडी, वारजे, तसेच पाषाण-बाणेर रस्त्यावरील टेकडीवर नागरिक मोठ्या संख्येने फिरायला जातात. टेकड्यांवर यापूर्वी नागरिकांना लुटण्याच्या घटना घडल्या आहेत.