राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अकृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १२ आणि २४ वर्षांची आश्वासित प्रगती योजना रद्द केली आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्व महाविद्यालयांचे शिक्षकेतर कर्मचारी मंगळवारपासून (५ फेब्रुवारी) बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यात पुणे जिल्हा पुणे विद्यापीठ महाविद्यालयीन शिक्षकेतर सेवक संघही सहभागी झाला असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष शशिकांत कामठे यांनी पत्रकाद्वारे दिली.
राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी महासंघाने बेमुदत संप पुकारला आहे. पुणे जिल्हा संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या संपाला पाठिंबा देण्यात आला. संघाचे सचिव दिलीप गुरव, अनिल अगावणे, ज्ञानेश्वर खरोक्षे आदी बैठकीला उपस्थित होते.
राज्य सरकारने नव्याने जाहीर केलेल्या आश्वासित प्रगती योजना रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे कार्यरत आणि सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच त्याचा सातव्या वेतन आयोगावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे सरकारने योजना रद्द करण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी संघातर्फे करण्यात आली आहे.