पुणे : प्रेमप्रकरणाच्या संशयातून महाविद्यालयीन युवकाचे अपहरण करुन त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला आहे. युवकाचे अपहरण आणि खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी तन्मय दीपक पाचरणे (वय २०, रा. पाचरणे आळी, वाघोली), वेदांत महादेव गपाट (वय १९, रा. शंकरनगर, खराडी) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत करण शंकर माळी (वय १९, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) याने या संदर्भात चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
करणने संगणकविषयक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. सध्या तो एका हाॅटेलमध्ये अर्धवेळ काम करत आहे. वाघोलीतील एका महाविद्यालयात करण, तन्मय आणि एक युवती शिक्षण घेत होते. करण मित्रांना भेटून दुचाकीवरुन कामाला निघाला होता. आरोपी तन्मयने करणच्या मोबाइलवर संपर्क साधला. दुचाकी बंद पडल्याची बतावणी करुन त्याला मुंढवा परिसरात बोलावले. तन्मयने करणला दुचाकीवरुन सोडण्यास सांगितले. काही अंतरावर तन्मयचे मित्र वेदांत आणि साथीदार मोटारीत होते.
हेही वाचा: भाजपकडून महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे कटकारस्थान; नाना पटोले यांची टीका
तन्मयने करणला मोटारीत बसण्यास सांगितले. करणला संशय आला. त्याने मित्राच्या मोबाइलवर संपर्क साधला. तेव्हा तन्मयने त्याचा मोबाइल काढून घेतला. तन्मय, वेदांत आणि साथीदारांनी करणला मोटारीत मारहाण केली. महाविद्यालयातील मैत्रिणीशी तुझे प्रेमप्रकरण सुरू असून तिच्याशी संबंध ठेवू नको, असे सांगून तन्मयने त्याला धमकावले. मुंढवा रस्त्यावरील एका खोलीत त्याला डांबून ठेवले. त्याला दारू पाजली. त्याच्या डोक्यात दारुची बाटली फोडली.
करणला बांबू आणि गजाने बेदम मारहाण केली. मारहाणीत करण बेशुद्ध पडला. पहाटे करण शुद्धीवर आला. त्यानंतर आरोपी तन्मय आणि साथीदारांनी त्याला खराडी परिसरात सोडून दिले. करणने या घटनेची माहिती भावाला दिली. त्यानंतर चंदननगर पोलीस ठाण्यात त्याने तक्रार दिली. पोलिसांनी तपास करुन दोघांना अटक केली. करणवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.