पुणे : मित्राशी झालेल्या आर्थिक व्यवहारातून एका महाविद्यालयीन युवकाने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महाविद्यालयीन युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून मित्राच्या विरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राज रावसाहेब गर्जे (वय २२, मूळ रा. पाटसरा, ता. आष्टी, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या महाविद्यालयीन युवकाचे नाव आहे. याबाबत राज गर्जेचे वडील रावसाहेब प्रल्हाद गर्जे (वय ४९, रा. पाटस, ता. आष्टी, जि. बीड) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून निरुपम जयवंत जोशी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – पुणेकरांना फुटला घाम…पारा चाळीशीपार!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज मराठवाडा मित्र मंडळाच्या विधी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो शिवाजी हाउसिंग सोसायटीमधील विद्यार्थी सहायक समितीच्या पी. डी. कारखानीस वसतिगृहात राहायला होता. राज आणि त्याच्या मित्रांमध्ये आर्थिक व्यवहारावरून वाद झाले होते. मित्राने आर्थिक कारणांवरून त्रास दिल्याने त्याने वसतिगृहाच्या राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. राज दोन वर्षांपासून वसतीगृहात राहत होता. त्याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्याचे वडील शेती करतात, तर दोन भाऊ पुण्यात काम करतात. राज अभ्यासात हुशार होता. महाविद्यालय तसेच वसतिगृहाच्या कार्यक्रमात तो सहभागी व्हायचा.
हेही वाचा – पुणे : जिल्हा परिषद भरती परीक्षेतील ‘या’ बदलामुळे हजारो उमेदवार अडचणीत
परीक्षा संपल्यानंतर तो वसतिगृहात गेला. तेथे त्याने मित्रांशी गप्पा मारल्या. त्यानंतर तो खोलीत गेला. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. राजच्या खोलीचा दरवाजा बंद होता. त्याच्या मित्रांनी दरवाजा वाजविला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. मित्रांनी खिडकीतून डोकावून पाहिले. तेव्हा राजने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चतु:शृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. राजने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. चिठ्ठीत आर्थिक व्यवहार तसेच मित्राच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे राजने म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष कोळी तपास करीत आहेत.