हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देणाऱ्या दलालांचा सध्या पुण्यात सुळसुळाट झाला असून महाविद्यालयांच्या प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच वर्षभर आंदोलनांमध्ये मग्न असलेल्या या टोळ्या आता सक्रिय झाल्या आहेत. प्रवेश मिळवून देतो अशा बोलीवर पैसे घेणाऱ्यांना बळी पडू नका, असे आवाहन महाविद्यालयांकडून करण्यात येत आहे.
बारावीचा आणि बाकीच्या स्पर्धा परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यामुळे आपल्याला नक्की कुठे प्रवेश मिळू शकतो याची कल्पना विद्यार्थी आणि पालकांना आली आहे. आपल्याला हव्या त्या महाविद्यालयात प्रवेशासाठी चौकशा, महाविद्यालयांचे कट ऑफ काय आहेत याचा अंदाज घेणे सुरू झाले आहे. यावर्षी बारावीचा निकाल चांगला लागला आहे. त्यामुळे पुण्यातील महाविद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी आणि प्रथम वर्षांला प्रवेश घेण्यासाठी बाहेरगावाहून येणारे विद्यार्थी यांमुळे पुण्यातील प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा वाढणार आहे. या पाश्र्वभूमीवर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच प्रवेश मिळवून देण्याची हमी देऊन पैसे उकळणाऱ्या टोळ्याही सक्रिय झाल्या आहेत. वर्षभर विविध संघटनांच्या माध्यमातून आंदोलनं, उपोषण करून शिक्षणसंस्था किंवा महाविद्यालयांशी आपले संबंध टिकवून ठेवणाऱ्या या टोळ्यांचे ‘अर्थपूर्ण’ काम आता सुरू झाले आहे.
सध्या कोणत्याही महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी गेले की पालकांच्या आसपास कुणीतरी घुटमळते. ही घुटमळणारी व्यक्ती बहुतेकदा महाविद्यालयातीलच असते. मग विद्यार्थ्यांला गुण किती, विषय कोणते हवे आहेत याचा अंदाज घेतला जातो. मग या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणे कसे कठीण आहे, इथे संस्थेच्या व्यवस्थापनाच्या मार्फतच कसे प्रवेश केले जातात, कट ऑफ किती जास्त आहे, अशा गप्पा विद्यार्थी आणि पालकांशी सुरू होतात. मग हळूच ‘करायची का अॅडमिशन, ओळख आहे.’ असा प्रश्न येतो.
सध्या प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच महाविद्यालयामध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी शुल्काव्यतिरिक्त ४ ते २० लाख रुपयांपर्यंत रक्कम सांगितली जात आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी केंद्रीय प्रवेश फेरीतून प्रवेश मिळाल्यास काही रक्कम परत करण्याचीही हमी दिली जात आहे. यावर्षी लांबलेल्या अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेमुळे पर्याय म्हणून पारंपरिक अभ्यासक्रम चालवणाऱ्या महाविद्यालयांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मोठी गर्दी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पाश्र्वभूमीवर प्रवेश देणारे दलाल प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच सक्रिय झाले आहेत.
काय काळजी घ्याल?
– पालकांनी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी एकटे अथवा अनोळख्या व्यक्तीबरोबर पाठवू नये.
– प्रवेशाची हमी देणाऱ्या अनोळखी व्यक्तीकडे कोणतीही कागदपत्रे देऊ नयेत.
– शक्यतो ऑनलाईन प्रवेश अर्जच भरावेत.
– व्यवस्थापन कोटय़ातून प्रवेश हवा असेल, तर कोणताही मध्यस्थ न ठेवता स्वत:च प्राचार्य अथवा व्यवस्थापकांची भेट घ्यावी.
– महाविद्यालयांच्या कट ऑफ गुणांची माहिती घेऊनच अर्ज भरावा.
मंगळवारपासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया
बारावीच्या गुणपत्रिका मंगळवारी मिळणार आहेत. त्यामुळे बहुतेक महाविद्यालयांमध्ये मंगळवारपासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. शहरातील बहुतेक सर्वच महाविद्यालयांमध्ये प्रवेश अर्ज आणि माहितीपुस्तकांची विक्री सुरू आहे. बहुतेक महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याचीही सुविधा देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आम्ही प्रवेश अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरून घेतो. त्यानंतर गुणांनुसार प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करुन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते; जेणेकरून विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये. महाविद्यालयाच्या आवारात, प्रवेश देण्यात येणाऱ्या खोलीत सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.’
– डॉ. चंद्रकांत रावळ, प्राचार्य, बीएमसीसी
‘आम्ही महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थी किंवा पालक आहेत, याची खात्री झाल्याशिवाय प्रवेश देत नाही. प्रवेशाच्या वेळीही विद्यार्थी आणि पालक असल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. मात्र, तरीही विद्यार्थी आणि पालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत काही शंका असल्यास पालकांनी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाशीच संपर्क साधावा.’
– डॉ. राजेंद्र झुंझारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय