पिंपरी महापालिकेचे महाविद्यालयांना आवाहन
मतदानाची टक्केवारी वाढावी, महाविद्यालयीन तरूणांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी, यासाठी पिंपरी महापालिकेने पुढाकार घेतला आहे.
शहरातील सर्व महाविद्यालयांनी या कामात महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने यांनी केले आहे.
मतदार नोंदणी व जनजागृती अभियानाअंतर्गत िपपरी-चिंचवड शहरातील महाविद्यालयांच्या प्रतिनिधींची सोमवारी बैठक घेण्यात आली, तेव्हा ते बोलत होते. या बैठकीस प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे, प्रमोद सकपाळ, उदयसिंह सातवेकर, सोपान खताळे, राजेश बनसोडे, एस. व्ही. आलकुंटे, मारूती पाटील आदी उपस्थित होते.
माने म्हणाले,की महाविद्यालयांनी मतदार नोंदणी व जनजागृती मोहीम राबवावी. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहता महापालिका निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी जनजागृती मोहिमा राबवण्याची आवश्यकता आहे. लोकशाही सक्षम करण्यासाठी नागरिकांनी हातभार लावला पाहिजे. मतदार नोंदणीच्या विशेष कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयात मतदार नोंदणी केंद्र स्थापन करावे, सर्व महाविद्यालयांनी समन्वय अधिकारी नेमावा, विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांच्याकडून भरून घेण्यात येणाऱ्या अर्जामध्ये त्यांनी मतदार यादीत नाव नोंदवल्याची खातरजमा करून घ्यावी. सर्व विद्यार्थ्यांकडून त्यांचे निवडणूक ओळखपत्र प्राप्त करून घेण्याची व्यवस्था महाविद्यालयांनी करावी, एनएसएस, एनसीसीच्या विद्यार्थ्यांवर मतदार जागृतीची जबाबदारी देण्यात यावी, आदी सूचना बैठकीत करण्यात आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा