पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनी, तसेच आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसी), आर्थिकदृष्ट्या मागास घटक (ईडब्ल्यूएस), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी), इतर मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून प्रवेशावेळी शिक्षण शुल्काची रक्कन न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे असतानाही शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती करणाऱ्या महाविद्यालयांवर आता कारवाई करण्यात येणार आहे.
तंत्रशिक्षण संचालक (डीटीई) डॉ. विनोद मोहितकर यांनी या बाबतचे निर्देश विभागीय सहसंचालकांना दिले. राज्य सरकारने चालू शैक्षणिक वर्षापासून ६४२ अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थिनींना पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना १०० टक्के शुल्क सवलत (मोफत शिक्षण) देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विद्यार्थिनींना, तसेच ईबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रवेशावेळी शिक्षण शुल्क न भरता प्रवेश देणे आवश्यक असताना काही महाविद्यालये विद्यार्थिनींकडे शुल्क भरण्यासाठी तगादा लावत आहेत. त्याबाबत तक्रारी करण्यात आल्यानंतर आता शुल्क भरण्याची सक्ती करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले.
हेही वाचा >>>कुरिअरद्वारे नशेबाजांना घरपोहोच अमली पदार्थ; विश्रांतवाडी अमली पदार्थ प्रकरणात कुरिअर कर्मचारी गजाआड
राज्यातील अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थिनींना प्रवेश देताना प्रवेश देताना शैक्षणिक शुल्कात १०० टक्के सवलत द्यायची आहे. तसेच ईबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून प्रवेशावेळी शिक्षण शुल्क न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शुल्क भरण्याची सक्ती करणाऱ्या महाविद्यालयांना विभागीय सहसंचालकांनी प्रत्यक्ष भेट देऊन महाविद्यालय प्रशासनाला समज द्यावी. तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल डीटीईकडे पाठवण्याबाबत डॉ. मोहितकर यांनी स्पष्ट केले.
तक्रार करण्यासाठीची सुविधा….
शुल्काची मागणी करणाऱ्या महाविद्यालयांची तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक आणि संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. ७९६९१२४४०, ७९६९१३४४१ या क्रमांकावर किंवा https://helpdesk.maharashtracet.org/ या दुव्यावर तक्रार नोंदवून दाद मागता येणार आहे.