लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : चार सप्तकांची केशव वेणू, तीन सप्तकातील पन्नालाल घोष वेणू आणि पारंपरिक बासरी अशा तीन बासऱ्यांचा मिलाफ करून संशोधनाद्वारे ज्येष्ठ बासरीवादक पं. केशव गिंडे यांनी ‘पांचजन्य वेणू’ विकसित केली आहे. पीव्हीसी पाईप आणि कार्बन खायबर या घटकांचा उपयोग करून बनविण्यात आलेल्या या वाद्यामध्ये संवादिनी प्रमाणे स्वरपट्टी बदलून अनेक स्वरांमध्ये बासरीवादन करणे शक्य होणार आहे. ‘पांचजन्य वेणू’चे स्वामीत्व हक्क मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

संगीत क्षेत्रामध्ये गायनाबरोबरच संवादिनी तसेच सतार, सरोद आणि वीणा अशा संतुवाद्यांमध्ये स्वर पट्टी बदलता येणे शक्य असते. परंतु आजपर्यंत बासरीवादनात स्वरांच्या पट्टीतील बदलानुसार अनेक बासऱ्यांचा वापर करावा लागतो. मात्र, पांचजन्य वेणू या एकाच बासरीवर ५० हर्ट्स म्हणजे तीन ते चार पट्ट्यामध्ये बासरी वाजविणे शक्य झाले आहे. नवनिर्मित पांचजन्य वेणूमुळे एकाच बासरीवर पांढरी चार, पांढरी तीन, काळी दोन आणि पांढरी दोन या स्वरांखेरीज अनेक स्वरांमध्ये बासरी वादन करणे सुलभ झाले आहे. बासरीवादकाला आता बासऱ्यांचा संच जवळ बाळगण्याची आवश्यकता नसून केवळ एकाच बासरीतून तीन ते चार स्वरांपर्यंत बासरीवादन करता येणे शक्य होणार आहे, अशी माहिती पं. केशव गिंडे यांनी सोमवारी दिली.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमधून अपहरण झालेल्या व्यक्तीची बीडमधून सुटका

प्रसिद्ध बासरीवादक राजेंद्र प्रसन्ना, पं. नित्यानंद हळदीपूर आणि पं. राजेंद्र कुलकर्णी यांनी पांचजन्य वेणूच्या निर्मिती करून पं. गिंडे यांनी बासरीवादकांवर उपकार केले असल्याची भावना व्यक्त केली.

पांचजन्य वेणूची ठळक वैशिष्ट्ये

  • ही बासरी एक ते सव्वा मीटर म्हणजे ४० ते ४५ इंच आहे.
  • बासरीची निर्मिती पीव्हीसी पाईप आणि कार्बन फायबरमध्ये करता येते. त्यामुळे बांबू वृक्षतोड बंद होवून पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल.
  • पांचजन्य वेणू ही तीन स्वतंत्र विभागात विभागली जात असल्याने बासरी वादकाला १६ इंचाच्या छोट्या सुटसुटीत अशा बासरीच्या पेटीत कार्यक्रमांना घेऊन जाणे सुलभ झाले आहे.
  • ही बासरी चार सप्तकाची केशव वेणू, तीन सप्तकातील पन्नालाल घोष वेणू, दोन सप्तकात वाजणारी पारंपारिक बासरी अशा तीनही बासरींचे एकत्रीकरणाने तयार झालेली आहे.
  • बासरीवादनामधील एकसुरीपणा जाऊन ठुमरी, टप्पा यासाठी विविध स्वरांच्या वेणुंचा आविष्कार या केवळ एकाच वेणुवर केल्यामुळे बासरी वादनात विविधता रंगत येईल.

Story img Loader