महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त मुख्य परीक्षा २०२२ आणि आरोग्य विभागाच्या गट क मधील पदांसाठीची भरती परीक्षा या एकाच दिवशी, १५ आणि १६ ऑक्टोबरला होणार आहेत. त्यामुळे दोन्ही परीक्षांसाठी अर्ज भरलेले उमेदवार अडचणीत आले असून, आता परीक्षेच्या तारखा बदलण्याची मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा – पुणे : कार्बन न्यूट्रल परिसरासाठी फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांची सायकल, ईव्ही रॅली
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२चे वेळापत्रक २८ जुलैलाच जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार कर निरीक्षक या पदासाठीची मुख्य परीक्षा १५ ऑक्टोबरला, तर कक्ष अधिकारी पदासाठीची परीक्षा १६ ऑक्टोबरला होणार आहे. ग्रामविकास विभागाने आरोग्य विभागाच्या गट क मधील पाच संवर्गांसाठीच्या पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम २६ ऑगस्टला शासन निर्णयाद्वारे जाहीर केला. त्यात ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने १५ आणि १६ ऑक्टोबरला होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे एकाच दिवशी दोन्ही परीक्षा असल्याने दोन्ही परीक्षांसाठी अर्ज भरलेले उमेदवार अडचणीत आले आहेत.
हेही वाचा – पुणे : संरक्षण विषयक स्थायी समितीची दक्षिण कमांड मुख्यालयाचा भेट
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे नीलेश गायकवाड म्हणाले, की एमपीएसीकडून जवळपास महिनाभर आधी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे आरोग्य भरतीचे वेळापत्रक निश्चित करताना शासनाने त्या दिवशी अन्य परीक्षा नाहीत ना, याची खातरजमा करणे आवश्यक होते. आता दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने उमेदवार अडचणीत आले आहेत. त्यामुळे आरोग्य भरती परीक्षेच्या तारखा बदलण्याची आवश्यकता आहे.