राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना एकमेकांकडील चांगल्या गोष्टी व उपक्रमांची माहिती व्हावी, त्याचे आदान-प्रदान करता यावे, या हेतूने पिंपरी पालिका व यशदा यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जवळपास २६ महापालिकांच्या आयुक्तांसह नगरपालिका व नगरपरिषदांचे वरिष्ठ अधिकारी या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.
बाणेर येथील राजभवन कॉम्प्लेक्स येथे २० व २१ ऑगस्टला ही कार्यशाळा होणार असून ती सर्वासाठी खुली राहणार आहे. नगरविकास खात्याचे प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक आदींचे मार्गदर्शन होणार आहे, अशी माहिती महापौर मोहिनी लांडे व आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी एलबीटीचे प्रमुख अशोक मुंढे, संगणक विभागप्रमुख नीलकंठ पोमण उपस्थित होते.
आयुक्त म्हणाले, माहिती तंत्रज्ञान साहाय्यभूत सेवा धोरणाअंतर्गत पिंपरी पालिकेकडून माहिती तंत्रज्ञान दिवस साजरा होणार असून त्यानिमित्त ही कार्यशाळा आहे. पालिकेने महसूल प्रशासनाची यशस्वी अंमलबजावणी केली, त्याबद्दल केंद्राकडून सुवर्णपदकही मिळाले आहे. या कार्यशाळेत महसूल प्रशासन प्रकल्पाच्या संपूर्ण माहितीचे सादरीकरण होणार असून चर्चासत्रे व व्याख्यानांद्वारे तांत्रिक विषयांचे मार्गदर्शन होणार आहे. दिल्ली, देहराडून तसेच झारखंड येथे महापालिकेच्या विकासाविषयक सादरीकरण करण्यात आले होते. तेव्हा याबाबतची माहिती राज्यातील स्थानिक संस्थानाही देण्याची सूचना राज्यशासनाने केली, त्यानुसार, या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ‘पिंपरी पालिकेची यशस्वी वाटचाल’ या विषयावर माजी आयुक्त आशिष शर्मा सादरीकरण करणार आहेत. तर, ‘पुढील धोरण व वाटचाल’ या विषयावर डॉ. श्रीकर परदेशी यांचे व्याख्यान होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा