पायरसीची ग्रासणारी समस्या आणि वाढते व्यापारीकरण हेच प्रकाशन व्यवसायासमोरील मोठे आव्हान आहे. त्यामुळे साहित्य प्रसाराच्या उद्देशातून नैतिकतेने व्यवसाय करणाऱ्या चांगल्या प्रकाशकांची गळचेपी होत असल्याचा सूर प्रकाशकांनी रविवारी व्यक्त केला.
राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मराठी भाषा विभाग, माहिती आणि जनसंपर्क कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय यांच्यातर्फे भरविण्यात आलेल्या ग्रंथोत्सवामध्ये ‘मराठी प्रकाशन व्यवसायासमोरील नवी आव्हाने’ या विषयावरील चर्चासत्रात ‘पद्मगंधा प्रकाशन’चे अरुण जाखडे, ‘अनुबंध प्रकाशन’चे अनिल कुलकर्णी आणि ‘साधना प्रकाशन’चे विनोद शिरसाट सहभागी झाले होते.
अनिल कुलकर्णी म्हणाले,की साहित्याविषयी प्रेम नसलेली मंडळी प्रकाशन क्षेत्रामध्ये आली असून व्यवसायाचे व्यापारीकरण झाले आहे. राज्यातील पुस्तक विक्रेते ही संस्था मोडकळीस आणली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये नैतिकतेने व्यवसाय करणाऱ्या प्रकाशकांची गळचेपी होत आहे. आमदार निधीतून खरेदी झालेल्या पुस्तकांची गुणवत्ता तपासली जात नाही.
अरुण जाखडे म्हणाले,की  प्रकाशन व्यवसायातील नैतिक अधिष्ठान संपुष्टात आले असून हा सभ्य लोकांचा व्यवसाय राहिला नाही. वाचकदेखील स्वस्तामध्ये मिळणारी  पायरेटेड पुस्तके विकत घेतात. या व्यवसायावर नियंत्रण ठेवणारे कोणतेही कायदे अस्तित्वात नाहीत.
विनोद शिरसाट म्हणाले,की आधुनिक तंत्रज्ञानामुळे पुस्तक निर्मिती सोपी झाली आहे. निर्मितीचा खर्च आणि विक्रीची किंमत यातील फरक कमी झाला तर, पुस्तकांची विक्री मोठय़ा प्रमाणावर होऊ शकेल. ऑनलाईन विक्री प्रकाशन व्यवसायासाठी उपयुक्त आहे. एकीकडे वाचन कमी झाल्याची ओरड होत असली तरी लेखकांची संख्या वाढतच आहे.