पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलीस आयुक्तालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग चालकांची बैठक आयोजित करण्यात आली.महापालिका प्रशासनाची परवानगी, तसेच अन्य कायदेशीर बाबींची पूर्तता न करता स्पर्धा परीक्षेचे बेकायदा वर्ग चालविणाऱ्यांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा इशारा दिला.स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी चार दिवसांपूर्वी रात्री उशिरा आंदोलन केले. आंदोलन करण्यास काही स्पर्धा परीक्षा वर्गचालक विद्यार्थ्यांना प्रवृत्त करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस आयुक्तालयात मंगळवारी स्पर्धा परीक्षा वर्गचालकांची बैठक आयोजित करण्यात आली. परीक्षा पद्धती, अभ्यासक्रमातील बदलांसह विविध मागण्यांसाठी यापूर्वी विद्यार्थ्यांकडून आंदोलने करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांनी चार दिवसांपूर्वी फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात आंदोलन केले. ते रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ही आंदोलने करण्यास काही स्पर्धा परीक्षा वर्गचालक, तसेच अभ्यासिका चालक विद्यार्थ्यांना प्रवृत्त करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.‘या प्रकरणात पोलिसांनी तपास केला. काही जणांची नावे पोलिसांना मिळाली आहेत. विद्यार्थ्यांना आंदोलनास प्रवृत्त करणारे संबंधित अभ्यासिका चालक, तसेच वर्गचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. शहरात स्पर्धा परीक्षा वर्ग, अभ्यासिकांची संख्या वाढली आहे.

संबंधित वर्ग, अभ्यासिकेने महापालिका प्रशासन, अग्निशमन दलाच्या सुरक्षाविषयक नियमांची पूर्तता केली आहे का, संबंधित इमारत सुरक्षित आहे का, तसेच तेथे वाहने लावण्याची सुविधा उपलब्ध आहे का, या बाबी तपासण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद केले.

शहरातील काही स्पर्धा परीक्षा वर्ग चालकांकडून विविध नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून आले आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा न घेणे, तसेच अग्निशमन दल, महापालिका, स्थानिक पोलीस ठाण्यांकडून परवानगी घेण्यात येत नाही. याअनुषंगाने शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. सुरक्षाविषयक नियमावलीचे पालन न करणाऱ्या स्पर्धा परीक्षा वर्गचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.अमितेश कुमार, पोलीस आयुक्त

आग प्रकरणात अभ्यासिकेविरुद्ध गु्न्हा

गेल्या वर्षी नवी पेठेतील एका अभ्यासिकेत आग लागली होती. सकाळी ही आग लागली होती. सुदैवाने त्या वेळी अभ्यासिकेत विद्यार्थी नव्हते. अन्यथा गंभीर दुर्घटना घडली असती. अभ्यासिका चालकाच्या बेजबाबदारपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे लक्षात आल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल केला.