उद्योगनगरी, कष्टकऱ्यांची नगरी, श्रीमंत शहर अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडसाठी गौरवगीत तयार करण्यात येत असून, त्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. शहराची जडणघडण, ऐतिहासिक संदर्भ, भौगोलिक माहिती, सांस्कृतिक वाटचाल यासह महापालिकेच्या विकासकामांमुळे झालेली प्रगती व कायापालट या सर्वाची नोंद या गौरवगीतात घेतली जाणार आहे.
वेगवेगळ्या कारणांनी सातत्याने चर्चेत असलेल्या शहराचे गौरवगीत करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यासाठी शहरातील कवी तसेच गीतकारांना आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आवाहन केले आहे. जे गीत निवडण्यात येईल, त्यास दहा हजार रूपयांचे मानधन दिले जाणार आहे. प्रेरणादायी स्वरूपाचे हे गौरवगीत पाच अंतऱ्याचे राहणार असून त्यात शहराच्या प्रगतीचा आढावा व महत्त्वाची माहिती समाविष्ट राहणार आहे. नामवंत कवींकडून या गीताचे परीक्षण होणार आहे. विद्युत विभागाच्या कार्यालयात ३० नोव्हेंबपर्यंत हे गीत स्वीकारले जाणार आहे, प्राप्त गीतांपैकी उत्कृष्ट गीताची निवड करण्यात येईल, असे आयुक्तांनी म्हटले आहे.

Story img Loader