चिखलीतील अनधिकृत बांधकाम व ‘फेसबुक’वर राजकारण्यांविषयी केलेल्या शेरेबाजीमुळे पिंपरी महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय आधीच अडचणीत होते, त्यात सोमवारी झालेल्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला आणि कठोर कारवाईची मागणी केली. गुन्हा दाखल झाल्याचे कारण देऊन जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांना निलंबित करण्यात आले. रॉय यांच्यावर गुन्हा असताना त्यांना वेगळा न्याय देण्यात आल्याचे सांगत आयुक्तांच्या कारवाईत दुजाभाव असल्याची टीका सदस्यांनी केली.
महापौर मोहिनी लांडे यांच्या अध्यक्षतेखालील सभेत रिपाइंच्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी याबाबतचे प्रश्न विचारले होते. याशिवाय, राष्ट्रवादीचे दत्ता साने यांनी डॉ. रॉय यांच्यावरील कारवाईचा विषय काढला. त्यावरून झालेल्या चर्चेत योगेश बहल, आर. एस. कुमार, भाऊसाहेब भोईर, मंगला कदम, श्रीरंग बारणे, शमीम पठाण, सुलभा उबाळे, सीमा सावळे, अनंत कोऱ्हाळे, अजित गव्हाणे, गोरक्ष लोखंडे आदींनी सहभाग घेतला. बहुतांश सदस्यांनी रॉय यांच्या विधानाचा निषेध करून त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होईपर्यंत सभेचे कामकाज होऊ न देण्याचा इशाराही दिला. प्रारंभी आक्रमक पवित्रा घेत सदस्यांनी रॉय यांच्यावर गंभीर आरोप केले. मात्र, नंतर काही प्रमुख नेत्यांशी रॉय यांची ‘फोनाफोनी’ झाली आणि लगेचच त्यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून आले.
नगरसेवकांना अपात्र ठरवण्याचे कायदे सांगता, अधिकाऱ्यांना मोकळे रान का, असा मुद्दा साने यांनी उपस्थित केला. आयुक्तांनी परस्परविरोधी भूमिका घेऊ नये, असे लोखंडे म्हणाले. रॉय निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते, असे पठाण म्हणाल्या. सभागृहाच्या स्वाभिमानावर आघात असल्याची टिपणी बारणे यांनी केली. ‘त्या’ पदोन्नतीपासून वादविवादांना सुरुवात झाली, याकडे गव्हाणे यांनी लक्ष वेधले.  
बहल-कुमार यांच्यात हमरीतुमरी
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल व माजी महापौर आर. एस. कुमार यांच्यात प्रश्नोत्तराच्या वेळी जोरदार वादावादी झाली. त्यांच्यात यापूर्वी अनेकदा खटके उडाले आहेत. दोघांनाही शांत राहण्याचे आवाहन महापौर करत होत्या. मात्र, त्यांची भांडणे सुरूच होती. तुम्ही ज्येष्ठच असे वागू लागल्यास इतरांनी काय आदर्श घ्यायचा, अशी टिपणी महापौरांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा