वेळ साधारण सकाळी साडेदहा, अकराची.. शिक्षण विभागीय उपसंचालक कार्यालयातील नुकतीच उघडलेली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दालने जागी होत होती.. त्याच वेळी आवारात काही गाडय़ा आल्या आणि अचानक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची पळापळ उडाली. शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी विभागीय शिक्षण उपसंचालनालयाला मंगळवारी अचानक भेट दिली आणि त्यानंतर आयुक्तांनी धारण केलेल्या ‘आवेशाने’ उपस्थित सर्दच झाले. ‘तुमच्या बापाचे राज्य आहे का.. ’ इथ पासून सुरू झालेली झाडाझडती..‘एक महिन्यात कामकाजाचे स्वरूप बदला, नाहीतर मी तुम्हाला बदलेन..’ असा इशारा देऊन संपली.
सकाळी साधारण ११ वाजता भापकर यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला भेट दिली. आल्या आल्या बाहेर ताटकळलेल्या अभ्यागतांची भेट घेऊन आयुक्त कार्यालयात शिरले. फायलींचे गठ्ठे असलेली सगळी कुलुपबंद कपाटे उघडायला लावून कोणत्या फायली किती रेंगाळल्या या मुद्दय़ावरून विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची झाडाझडती त्यांनी सुरू केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागितलेली माहिती वेळेवर का दिली नाही, जाणीवपूर्वक माहिती दडवत आहात का? वाट्टेल ते निर्णय घेणारे तुम्ही कोण? प्रकरणे वर्षांनुवर्षे प्रलंबित ठेवायला तुमच्या बापाचे राज्य आहे का? अशा प्रश्नांपासून सुरू झालेली सरबत्ती, शिक्षण आयुक्तांचा आवेश आणि उल्लेख करता येणार नाही असे शब्दप्रयोग याने विभागातील अधिकारी आणि कर्मचारी हतबुद्धच झाले. आपापल्या कामांसाठी कार्यालयाबाहेर जमलेले शिक्षक, कर्मचारी यांचे मात्र शिक्षण आयुक्तांच्या या भेटीने चार घटका मनोरंजन केले.
शिक्षक मान्यता, संचमान्यता याबरोबरच प्रलंबित असलेल्या विविध प्रकरणांबाबत अहवाल देण्यासाठी आयुक्तांनी मंगळवार सायंकाळपर्यंतची मुदत विभागातील कर्मचाऱ्यांना दिली. मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालयात झालेल्या निलंबनाच्या कारवाईची उदाहरणे देऊन ‘तुमचेही असे होईल..’ असा इशाराही दिला. ‘अजून पंधरा दिवसांनंतर कार्यालयाला पुन्हा भेट देईन. तोपर्यंत तुमचे कामकाज बदला नाहीतर तुम्हाला बदलेन..’ असा इशारा विभागीय शिक्षण आयुक्त रामचंद्र जाधव यांना देऊन ही नाटय़मय पाहणी संपली.
—
‘‘शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या मदत क्रमांकावर अनेक तक्रारी येत असतात. गेल्या दहा महिन्यात आलेल्या तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी या पुणे विभागीय कार्यालयाबाबत होत्या. त्यामुळे अशाप्रकारे अचानक भेट देण्याचे ठरवले. शिक्षण हक्क कायद्यातील प्रवेश प्रक्रिया आणि इतर अनेक मुद्दय़ांवर तक्रारी आल्या होत्या. याबाबत जाधव यांना अनेकदा तोंडी सूचना देऊनही विभागाच्या कामकाजात फारसा बदल झालेला दिसला नाही म्हणून अचानक भेट देण्याचे ठरवले. मात्र आता समोर आलेले चित्र हे लाजिरवाणे आहे. अत्यंत भोंगळपद्धतीने काम सुरू आहे. नोंदी ठेवलेल्या नाहीत. प्रत्येक प्रकरण नियोजित वेळेत हातावेगळे झालेच पाहिजे.’’
– डॉ. पुरुषोत्तम भापकर, शिक्षण आयुक्त
दुहेरी लाजिरवाणे चित्र
शिक्षण विभागात धूळ खात साठून असलेले फायलींचे गठ्ठे, आलेल्या तक्रारी, न हलणारी व्यवस्था यामुळे शिक्षण आयुक्तांना विभागातील कारभाराचे लाजिरवाणे चित्र दिसले. मात्र आयुक्तांकडून करण्यात आलेला भाषेचा वापर आणि त्यामुळे झालेली कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था पाहता आयुक्तांच्या या नाटय़मय पाहणीचे चित्र बघ्यांसाठीही लाजिरवाणेच ठरले.
शिक्षण आयुक्तांच्या ‘आवेशाने’ शिक्षण विभाग दिग्मूढ
त्याच वेळी आवारात काही गाडय़ा आल्या आणि अचानक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची पळापळ उडाली
आणखी वाचा
First published on: 16-12-2015 at 03:39 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commissioner incharge education department