जकात रद्द करून एलबीटी (स्थानिक संस्था कर) लागू केल्यानंतरच्या पहिल्या वर्षांत पिंपरी पालिकेला ३०० कोटींची तूट येणार असल्याची कबुली देत, ही तूट भरून काढण्यासाठी बांधकाम परवानगी व मिळकतकर विभागाचे उद्दिष्ट दोन्ही मिळून १५० कोटींनी वाढवून दिल्याची माहिती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी गुरूवारी दिली. वारंवार बजावूनही पालिकेची थकबाकी न भरणाऱ्या नागरिकांना वठणीवर आणण्यासाठी १५ जानेवारीपासून दहा बँड पथके नियुक्त करण्यात येणार आहेत. ते थकबाकीदारांच्या दारात जोरजोरात बँड वाजवणार आहेत. या माध्यमातून थकबाकी वसूल होईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
एक एप्रिलपासून एलबीटी लागू झाली, पिंपरीत २० नोव्हेंबरअखेर ५६६ कोटी रूपये एलबीटी जमा झाली. जकात असताना मागील वर्षी याच कालावधीत ७७६ कोटी रूपये जकातीचे उत्पन्न होते. ८ महिन्याचा आढावा घेता २१० कोटी रूपये तूट झाली असून उर्वरित चार महिन्यांची तूट गृहीत धरल्यास हा आकडा वर्षांकाठी ३०० कोटी रूपये होणार आहे. मंदी, जकात न भरण्याची प्रवृत्ती ही उत्पन्न कमी होण्याची कारणे असून थकबाकीदारांची संख्या मोठी आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी कठोर भूमिका पालिकेने घेतली आहे. येत्या १५ जानेवारीपासून १० बँड पथके थकबाकी वसूल करण्यासाठी नियुक्त करण्यात येतील. थकबाकी भरेपर्यंत संबंधित नागरिकांच्या घरासमोर बँड वाजवण्यात येणार आहे, जेणेकरून थकबाकी वसूल होऊ शकेल.
पाणीपुरवठा विभागातील
५० जणांना ‘कारणे दाखवा’
पाणीपुरवठा विभागाकडील ५० कोटींची थकबाकी वसूल करण्यास संबंधित अधिकाऱ्यांना अपयश आले असल्याने या विभागातील मीटर निरीक्षक, अभियंते, विभागप्रमुख अशा सर्व ५० जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. बिले वेळेवर दिली जात नाहीत, त्यांची वसुली होत नाही, अनधिकृत नळजोड दिले जातात, त्याला पायबंद घातला जात नाही, असा ठपका ठेवण्यात आला आहे.

Story img Loader