पिंपरी : दूषित पाण्यामुळे गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराची लागण हाेत असल्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच शहराच्या विविध भागात असलेल्या खासगी पाणी (आरओ) प्रकल्पावर महापालिका, अन्न व औषध प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील खासगी पाणी (आरओ) प्रकल्प बंद केले आहेत. शिवाय पाण्याची गुणवत्ता आणि बॉटलिंग प्रक्रियेचा सखोल आढावा व मूल्यांकन केल्यानंतरच त्यांना पुन्हा प्लांट चालू करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
आरओ अनिश्चित काळासाठी राहणार बंद
दूषित पाण्यामुळे गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) प्रादुर्भाव व वाढत्या सार्वजनिक आरोग्यविषयक समस्यांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने खासगी आरओ प्लांट्सच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अनधिकृत खासगी आरो वॉटर ऑपरेटर्स दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करुन पुरवठा करत असल्याचे निदर्शनास आले होते. असे दूषित पाणी प्रामुख्याने बोअरवेल्स व उघड्या जलस्त्रोतांमध्ये आढळते. नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी आणि भविष्यातील आरोग्यविषयक समस्या टाळण्यासाठी सध्या शहरात दूषित पिण्याचा पुरवठा करणाऱ्या अनधिकृत वॉटर बॉटलिंग आणि आर.ओ प्लांट्सवर तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे.
प्रभागनिहाय करणार कारवाई
पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, प्लंबर आणि सुरक्षा रक्षक यांच्या समन्वयाने तसेच आरोग्य वैद्यकीय विभागाकडून परवान्याबाबत तपासणी करूनच या प्लांट्सच्या बंदीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शिवाय आरओ प्रकल्प (प्लांट) बंद बाबतच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर वैद्यकीय विभागामार्फत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
दूषित भूजलाचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर केल्याने गिलियन बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव वाढू शकतो. आर.ओ प्लॉन्ट्स बहुतेक वेळा परवाना किंवा सुरक्षिततेच्या निकषांचे पालन न करता पाणी पुरवत असल्याचे निदर्शनास आले आहे. या कारणामुळे हे पाणी पिण्यासाठी वापरणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका संभवतो. नागरिकांसाठी सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.
जीबीएसच्या पार्श्वभूमीवर आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शहरातील नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळावे, यासाठी अनधिकृतपणे दूषित पाण्याची बॉटलिंग करणाऱ्या आरओ प्लांट्सवर कठोर कारवाई केली जात आहे. पाणी हे आरोग्याचा मूलभूत घटक असल्याने त्याच्या गुणवत्तेचा सखोल आढावा घेतल्यानंतरच संबंधित प्लांट्सना परवानगी देण्यात येणार असल्याचे , पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.