पुणे : मानसिक आरोग्याच्या प्रश्नांबाबत आजही समाजामध्ये असलेली कलंक भावना दूर करण्यासाठी विस्तृत कार्यक्रम हाती घेण्याची गरज लॅन्सेटने अधोरेखित केली आहे. मानसिक आरोग्याचे प्रश्न असलेले आणि नसलेले यांच्यामध्ये संवाद वाढवण्यातून ही कलंक भावना दूर करणे शक्य असल्याची सूचना लॅन्सेटकडून करण्यात आली आहे. मानसिक आरोग्य या विषयाबाबत समाजात असलेली कलंक भावना दूर करण्यासाठी धोरणात्मक कार्यक्रम राबवण्याची गरज लॅन्सेटकडून अधोरेखित करण्यात आली आहे. मानसिक आरोग्याच्या प्रश्नांनी ग्रासलेल्या व्यक्तींना येणाऱ्या कलंक भावनेचे अनुभव नोंदवणे, त्यांच्या निवारणासाठी नियोजन करणे, संवाद, समुपदेशन आणि सर्वसमावेशक धोरण राबवणे या बाबींची गरज लॅन्सेटकडून मांडण्यात आली आहे.
ही गरज मांडताना अशा प्रयोगांच्या यशस्वी अंमलबजावणीबाबतचे अनुभवही समोर ठेवण्यात आले आहेत. विशेषत: मानसिक आरोग्याच्या प्रश्नांमुळे कलंक भावनेचा अनुभव घेणारे आणि तसा अनुभव न घेतलेले यांच्यामध्ये संवादाचा पूल बांधल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसणे शक्य असल्याचे लॅन्सेटकडून नमूद करण्यात आले आहे. शारीरिक अपंगत्वामुळे कलंक भावनेचा सामना करणाऱ्या व्यक्ती, आत्महत्येसारखे विचार मनात आलेल्या,तसेच इतरांकडून वेगळी वागणूक मिळणाऱ्या व्यक्ती यांच्या मानसिक अवस्थेत तसेच स्वीकारले जाण्याच्या भावनेमध्ये अशा तात्पुरत्या तसेच दीर्घकालीन संवादांच्या कार्यक्रमातून फरक पडल्याचे लॅन्सेटकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मानसिक अस्वास्थ्य हा त्या व्यक्तीने स्वत:च कलंक मानणे, संस्थात्मक आणि सार्वजनिक जीवनात त्या व्यक्तीला येणारा कलंक भावनेचा अनुभव आणि संरचनात्मक कलंक असे या कलंक भावनेचे वर्गीकरण लॅन्सेटकडून करण्यात आले आहे. कामाच्या ठिकाणी तसेच कुटुंबातील सदस्यांकडून मिळणारी कमीपणाची वागणूक, नकारात्मकता, सातत्याने दर्शवली जाणारी असहमती या बाबींमुळे कलंक भावना, आपण नकोसे आहोत अशी भावना वाढीस लागते. ती दूर करण्यासाठी संवादाचा पर्याय आजमावणे, त्या व्यक्तींना स्वत:साठी इतरांच्या विरोधात उभे राहण्यासाठी पाठबळ देणे या कृती त्यांच्यातील तसेच त्यांच्याबाबतची कलंक भावना दूर करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे लॅन्सेटने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.