नाटय़गृहांमध्ये नाटकांऐवजी स्नेहसंमेलने, कंपन्यांच्या बैठका
‘उद्योगनगरी’बरोबरच ‘सांस्कृतिकनगरी’ म्हणून पिंपरी-चिंचवड शहराची ओळख निर्माण होऊ लागली आहे, असे भाषणांमध्ये सातत्याने कितीही सांगण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात तसे पोषक वातावरण शहरात नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. नाटय़गृहांमध्येच नाटक व सांस्कृतिक कार्यक्रमांना अघोषित बंदी असल्याप्रमाणे सध्याची परिस्थिती आहे. शाळा-महाविद्यालयांची स्नेहसंमेलने, कंपन्यांच्या बैठका, विविध समाजांचे मेळावे, महापालिकेचे कार्यक्रम आदींसाठीच प्राधान्याने तारखा दिल्या जात असल्याने नाटक कंपन्यांना प्रचंड झगडावे लागत आहे. सुट्टीच्या दिवशी नाटकांना प्राधान्य देण्याचे धोरण कागदावरच राहिले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात चार नाटय़गृहे आहेत. त्यातील संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे नाटय़गृह दुरुस्तीच्या कारणास्तव जवळपास वर्षभर बंद राहणार आहे. तेथील एकूण परिस्थिती पाहता नाटक कंपन्या तेथे नाटक लावण्यास तयार होत नाहीत. सांगवीचे निळूभाऊ फुले नाटय़गृह नुकतेच सुरू झाले आहे. तेथे शाळांच्या संमेलनांचे आरक्षण सर्वाधिक आहे. एकूण रागरंग पाहून अद्याप नाटक कंपन्यांनी या ठिकाणी नाटके लावण्यास प्रारंभ केलेला नाही. भोसरीतील अंकुशराव लांडगे नाटय़गृहामध्ये नाटकांना प्रतिसाद मिळत नाही, अशी भावना नाटक कंपन्यांकडून व्यक्त केली जाते. त्यामुळे स्नेहसंमेलने व कंपन्यांच्या बैठकाच या ठिकाणी प्राधान्याने होतात.
चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाटय़गृहासाठी सर्वाधिक मागणी आहे. मात्र, येथील तारखा मिळवणे हे नाटक कंपन्यांसाठी एकप्रकारचे दिव्य असते. त्यामुळे या ठिकाणी नाटकांचे प्रयोग मर्यादित स्वरूपात होतात. चांगली ओळख असल्याशिवाय अथवा बडय़ा लोकप्रतिनिधींच्या शिफारशींशिवाय तारीख मिळणे अवघड असल्याचा अनुभव अनेकजण नियमितपणे घेतात. लोकप्रतिनिधींच्या नको इतक्या हस्तक्षेपामुळे अनेकांना मिळालेल्या तारखा सोडून द्याव्या लागल्या आहेत. आता तर नगरसेवकांच्या शिफारशीच मागणीपत्रासोबत जोडलेल्या दिसून येतात. राज्य शासनाच्या विविध स्पर्धाचे कार्यक्रम याच ठिकाणी होतात. महापालिकेचे कार्यक्रम असल्याचे सांगून अनेकदा तारखा राखीव ठेवल्या जातात, प्रत्येक वेळी त्या दिवशी कार्यक्रम होतोच, असे नाही. अनेकदा महापालिकेच्या आरक्षित तारखा इतरांना दिल्या जातात, असे आढळून येते. सुट्टीच्या दिवशी नाटकांना प्राधान्य देण्याची घोषणा सत्तारूढ नेत्यांनी केली. मात्र, ते नाटक धोरण कागदावरच राहिले आहे. आता नाटय़गृहांची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांकडे देण्यात आली आहे, त्यामुळे नाटय़गृहांच्या धोरणात एकसुरीपणा राहिला नाही. अशा प्रतिकूल वातावरणामुळे शहरात होणाऱ्या नाटकांची संख्या दिवसेंदिवस रोडावली आहे. आता चिंचवड नाटय़गृह सुशोभीकरणासाठी बराच काळ बंद ठेवण्यात येणार असल्याने शहरात होणारी नाटके पूर्णपणे बंद होणार आहेत.