पुणे : अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या संगणक अभियंत्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे. लोकअदालतीत शनिवारी (२२ मार्च) दावा निकाली काढण्यात आला. तडजोडीत संगणक अभियंत्याच्या कुटुंबीयांना दावा दाखल केल्यापासून एक वर्षांच्या आत दोन कोटी ४४ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाणार आहे.
मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य जिल्हा, सत्र न्यायाधीश बी.पी.क्षीरसागर आणि ॲड.अतुल गुंजाळ यांच्या पॅनलसमोर झालेल्या सुनावणीत दावा निकाली काढण्यात आला. दुचाकीस्वार ३३ वर्षीय संगणक अभियंता ४ फेब्रुवारी २०२४ रोजी सिंहगड रस्त्याने निघाला होता. त्याच्यासोबत मित्र होता. खडकवासला धरण परिसरातून विरुद्ध दिशेने आलेल्या टेम्पोने दुचाकीला धडक दिली.
अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या संगणक अभियंत्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर संगणक अभियंत्याची पत्नी, आई, बहिण आण भाच्यांनी टेम्पोच्या विमा कंपनीविरुद्ध दावा १९ एप्रिल २०२४ रोजी मोटार अपघात न्यायप्राधिकरणाता दावा दाखल केला होता.
मृत्युसमयी संगणक अभियंत्याचे वय ३४ हाेते, तसेच त्याला दरमहा एक लाख ६७ हजार ३३३ रुपये वेतन मिळत होते. त्याचे वय, अवलंबून असलेले कुटुंबीय यांचा विचार करुन दोन कोटी ८५ लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली होती. लोकअदालतीत तडजोडीत दोन कोटी ४४ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे मान्य करण्यात आले. संगणक अभियंत्याच्या कुटुंबीयांकडून ॲड. संजय राऊत आणि ॲड. अनिता राऊत यांनी बाजू मांडली. विमा कंपनीकडून ॲड. शाम माहेश्वरी यांनी काम पाहिले. ॲड. माहेश्वरी यांनी तडजोडीसाटी महत्त्वाची भूमिका बजावली.