‘गानवर्धन’ या संस्थेतर्फे शास्त्रीय गायन, वादन आणि नृत्य पुरस्कारासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धामध्ये १८ ते ३० वर्षे वयोगटातील कलाकार सहभागी होऊ शकतात.
संगीतप्रेमी प्रायोजकांनी संस्थेकडे दिलेल्या देणगीतून संगीत पुरस्कारांचे वितरण केले जाते. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कलाकाराने आपल्या गायन, वादन आणि नृत्याविष्काराची सीडी संस्थेकडे पाठवावयाची आहे. तज्ज्ञांमार्फत प्राथमिक चाचणी घेऊन १५ आविष्कारांची अंतिम फेरीसाठी निवड केली जाते. त्यातील विजेत्या कलाकारांना परीक्षकांच्या निर्णयानुसार पुरस्कारांचे वितरण केले जाते.
शास्त्रीय गायनासाठी डॉ. श्रीरंग संगोराम, उषाताई मुजुमदार, पं. त्र्यंबकराव जानोरीकर, नूपुर काशिद, प्रतिभा परांजपे, रामराव कोरटकर आणि दत्तात्रेय रत्नपारखी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, कथक नृत्यासाठी डॉ. विजया भालेराव स्मृती पुरस्कार आणि वादनासाठी इंदुमती काळे स्मृती पुरस्कार प्रदान केला जातो. यंदाच्या वर्षी ‘व्हायोलिन’ या वाद्यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. सहभागी स्पर्धकांनी २० मिनिटांच्या गायन-वादनाची ध्वनिमुद्रित सीडी, दोन छायाचित्रे, स्वत:ची माहिती, गुरुचे नाव, संगीत शिक्षणाचा कालावधी, वयाच्या दाखल्याची झेरॉक्स ही माहिती संस्थेचे विश्वस्त प्रसाद भडसावळे यांच्याकडे आदिनाथ अपार्टमेंट्स, पहिला मजला, माणिकबाग, सिंहगड रस्ता, पुणे ५१ (मो. क्र. ९८२२८५०७१२ किंवा ८७९३१४८१९७) या पत्त्यावर ३० सप्टेंबरपूर्वी पाठवावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.