संचारबंदी काळात लघुपटांसाठी स्पर्धा
चिन्मय पाटणकर लोकसत्ता
पुणे : टाळेबंदीत घराबाहेर न पडता लघुपट निर्मिती करण्याचे आव्हान कलाकारांना देण्यात आले असून, लघुपट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे संचारबंदीच्या काळातील गोष्टी आता लघुपटाच्या माध्यमातून चित्रित होणार आहेत.
करोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून देशभरात संचारबंदी लागू झाल्यानंतर कलाकार, तंत्रज्ञांना घरी बसावे लागले आहे. अनेक कलाकार वाचन, लेखनात आपले मन रमवत आहेत. अशा परिस्थितीत नव्या दमाच्या लेखक, दिग्दर्शक, कलाकारांसाठी संचारबंदीचा काळ आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळेच त्यांच्यातील सृजनशीलतेला चालना देण्याचा, आव्हान देण्याचा प्रयत्न लघुपट स्पर्धाच्या माध्यमातून केला जात आहे.
हिंदी चित्रपट क्षेत्रातील दृश्यम फिल्म्स या निर्मिती संस्थेतर्फे होत असलेल्या ‘स्टे होम’ लघुपट स्पर्धेत १४ एप्रिलपर्यंत ४ मिनिटांपर्यंतचा लघुपट पाठवता येईल. दिग्दर्शक ओनीर यांच्या कॅरट फिल्म्सतर्फे होत असलेल्या लघुपट स्पर्धेत १० एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. त्यात दोन मिनिटांचा लघुपट करावा लागेल. नाशिकच्या रावी मोशन पिक्चर्स या संस्थेचे जयेश आपटे, अभिनेत्री कल्याणी मुळे आणि दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी आयोजित के लेल्या स्पर्धेत १० एप्रिलपर्यंत नोंदणी करता येणार असून, एक मिनिट ते दहा मिनिटांपर्यंतचा लघुपट करता येईल. या स्पर्धामधील महत्त्वाची अट म्हणजे, घराबाहेर न पडता लघुपट तयार करावा लागणार आहे. त्यामुळे संचारबंदीच्या काळात आपल्या कल्पनाशक्तीला ताण देऊन घराघरातील गोष्टी लघुपटाच्या माध्यमातून चित्रित करण्याची संधी कलावंतांना मिळणार आहे.
उपलब्ध असलेले स्रोत आणि घराबाहेर न पडता चित्रीकरण करून लघुपट करणे आव्हानात्मक आहे. संचारबंदीच्या काळात आपली सृजनशीलता किती जागी आहे, हे लघुपट करून पाहता येईल.
– सुनील सुकथनकर, ज्येष्ठ दिग्दर्शक