लायन्स क्लब ऑफ पुणे सहकारनगर आणि गांधर्व महाविद्यालयातर्फे महाराष्ट्र गंधर्व २०१४  या नाटय़संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १० ते १५ वर्षे आणि १६ ते २५ वर्षे अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा २६ जानेवारी रोजी भरत नाटय़ मंदिर येथे होणार असून दोन्ही गटांतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
प्राथमिक फेरीसाठी दोन्ही गटातील स्पर्धकांनी दोन नाटय़पदांचे ध्वनिमुद्रण सीडी किंवा ऑडिओ क्लपिं ई-मेलच्या माध्यमातून पाठवावयाची आहे. तज्ज्ञ परीक्षकांची समिती दोन्ही गटातील प्रत्येकी २० स्पर्धकांची निवड करणार आहे. ही फेरी गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिर येथे होणार आहे. अंतिम फेरीसाठी दोन्ही गटातून प्रत्येकी १० स्पर्धकांसह पाच हार्मोनिअमवादकांची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धकांसाठी २५ जानेवारी रोजी दिवसभराची मार्गदर्शन कार्यशाळा होणार आहे. एका हार्मोनिअमवादकास आर्गन शिक्षणासाठी दरमहा तीन हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, अशी माहिती गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद मराठे आणि लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. प्रसाद खंडागळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी प्रवेश अर्जासाठी गांधर्व महाविद्यालयाच्या फेसबुक पेजवर संपर्क साधावा. संगीत नाटकांच्या संवर्धनासाठी ५ जानेवारीपासून प्रत्येक रविवारी कुलवधू, कटय़ार काळजात घुसली, स्वयंवर, सौभद्र ही संगीत नाटके सादर होणार असून कीर्ती शिलेदार संगीत नाटकांची वाटचाल सादर करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा